सांगली : कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी गणेश शेवाळेला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते अद्याप फरार आहे.


कडकनाथ कोंबडी व्यवसायात गुंतवणूक केलेल्या हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महारयत अॅग्रो कंपनीचा संस्थापक सुधीर मोहिते, संचालक संदीप मोहिते, गणेश शेवाळे, विनय शेंडे, हणमंत जगदाळे या पाच जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी संदीप मोहिते, हणमंत जगदाळे यांना आधीच अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री गणेश शेवाळेला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलं.


मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते, विनय शेंडे अजूनही फरार आहे. सुधीर मोहितेचा अद्याप पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या फसवणूक प्रकरणी आत्तापर्यंत 1100 जणांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.



रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका


सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालनाची शक्कल लढवित गुंतवणुकीची भन्नाट योजना सुरू केली आहे. ‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका’ असं या योजनेचे स्वरुप आहे. यात प्रोजेक्ट मालकास एकूण 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. पक्षी घेताना 40 हजार आणि राहिलेले 35 हजार 3 महिन्यांनतर अशा दोन टप्प्यात रक्कम घेतली जाते. या कालावधीत 200 पक्षांच्या युनिटसाठी कंपनीकडून खाद्य, औषधे, लस, भांडी दिली जातात.


तीन महिन्यानंतर कंपनी शेतकर्‍याकडे 100 मादी आणि 20 नर ठेवून 80 पक्षी घेऊन जाते. 4 ते 5 महिन्यानंतर पक्ष्यांनी अंडी देणे सुरु केल्यानंतर कंपनी पहिली 2 हजार अंडी प्रतिनग 50, दुसरी दोन हजार अंडी 30 व तिसरी 3500 अंडी 20 रुपये या दराने घेऊन जाते. यातून शेतकर्‍याला एका वर्षात 2 लाख 30 हजार आणि 375 रुपयाप्रमाणे 120 पक्ष्यांच्या विक्रीतून 45 हजार असे पावणे तीन लाख देण्याचे आमिष दाखविले. 75 हजारांच्या बदल्यात वर्षभरात मोठा परतावा मिळत असल्याने तसेच दोन टप्प्पात रक्कम द्यायची असल्याने अनेक शेतकरी या योजनेला सहजासहजी बळी पडले आहेत. सुमारे 8 हजार शेतकर्‍यांचे सुमारे 300 ते 400 कोटी रुपये यात अडकले असल्याची प्राथमिक शक्यता आहे.



संबंधित बातम्या