Sharad Pawar : मला लोक शेतीच्या जास्त अडचणी सांगतात. त्यांना मी अजूनही शेती खात्याचाच मंत्री असल्यासारखंच वाटतं असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. लोक अजूनही मला सरकारी निर्णय घ्या, हे करा ते करा सांगत असल्याचे पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. मात्र, त्यावर पुन्हा पवार म्हणाले की, टाळ्या वाजवून काही उपयोग नाही, कारण मी मंत्री नाही. सध्या शेतीचे खूप प्रश्न आहेत. पण भुकेचा प्रश्न सोडावयाचा असेल तर शेतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे पवार यावेळी म्हणाले.


कन्हेरी येथे महा ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन अर्थात मोर्फा च्या राज्यस्तरीय संचालक व जिल्हा अध्यक्षांच्या बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत पवार बोलत होते. यावेळी  पवारांनी शेतीसंदर्भातील विविध मुद्यांना हात घातला. राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात काही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने घेतली जातात. तसेच ज्या फळपिकांना राज्यात जीआय मानांकन मिळाले आहे, अशा पिकांवर लक्ष देऊन त्या फळपिकांतील सेंद्रीय उत्पादनाबाबत आपण मोर्फाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन प्रयत्न करावा असेही पवार म्हणाले.


यशवंतराव चव्हाण यांची सांगितली आठवण


यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची एक आठवण सांगितली. एकदा बोलताना यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, शेतीचे प्रश्न म्हणजे रावणाच्या दहा हातासारखे आहेत. कुठे जमिनीचा, कुठे मातीचा, कुटे पाण्याचा, कुठे वीजेचा तर कुठे मार्केटींगचा प्रश्न असतो. आज शेतीचे खूप प्रश्न आहेत. प्रश्न असले तरी देशात अजूनही 57 ते 58 टक्के लोक शेती करतात. भुकेचा प्रश्न सोडावयाचा असेल तर शेतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 


पहिल्यांदा कृषीमंत्री झाल्यानंतरचा किस्सा  


शेतीमध्ये एक काळ असाही आला की, पहिल्यांदा उत्पादन कसे वाढवायचे यावर लक्ष केंद्रीत केले. मी 2004 ला कृषीमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो. घरी आल्यानंतर सहीसाटी पहिली फाईल ब्राझीलवरुन गहू आयात करण्यासंदर्भातील होती. मी अस्वस्थ झालो. आपण शेतकऱ्यांच्या कुटुंबात वावरतो आणि आपल्या देशाला गहू आयात करावा लागतो. मी त्या फाईलवर काही सही केली नाही. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा फोन आला. ते म्हणाले की फाईलवर तुम्ही सही केली नाही. आपल्या देशात गव्हाचा स्टॉक किती आहे हे आपल्याला माहित आहे का? केवळ 20 ते 25 दिवस पुरेल एवढाच गव्हाचा स्टॉक देशात आहे. तो संपला तर देशात संकट येईल, असे मनमोहन सिंह म्हणाले. त्यानंतर मला त्या फाईलवर सही करावी लागली. त्यानंतर आयातीचा निर्णय घ्यावा लागला. पण मी हे चित्र बदलायचा निर्णय घेतला. त्यानंतर आपला देश गव्हाचा जगातला दोन नंबरचा निर्यात देश झाला. तांदळाच्या बाबतीत एक नंबरचा निर्यतदार झाला. त्यावेळी धोरण नीट होती. त्याचा परिणाम अन्नधान्यात आपला देश स्वयंपूर्ण झाल्याचे पवार यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: