Devendra Fadnavis : जळगाव जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांवर बारा अंकी बारकोड क्रमांक नसल्यामुळं धान्याचा लाभ मिळत नाही. याबाबतची माहिती जानेवारी 2022 दरम्यान निदर्शनास आली आहे. हे खरे आहे काय? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच बारा अंकी बारकोड क्रमांक टाकून देण्यासाठी दलालांकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अधिकारी जुमानत नाहीत,  त्यामुळं आता कारवाई करणार का? असा सवालही फडणवीस यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना केला.


प्राधान्य कुटुंब गट व अंत्योदय योजनेत समाविष्ट असलेल्या जळगाव शहरातील शिधापत्रिका धारकांना त्यांच्या शिधापत्रिकेवर बारा अंकी बारकोडचा शिक्का तहसील कार्यालयातून देण्यात येतो. हेही खरे आहे काय?  खरे असल्यास, नवीन शिधापत्रिका काढणे व त्यावर बारा अंकी बारकोड क्रमांक टाकून देण्यासाठी दलालांकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी तसेच दुकानदार बारकोड असलेल्या शिधा पत्रिका धारकांनाही धान्याचा लाभ नाकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय? असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे. नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत? असे सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले. 


दरम्यान, फडणवीस यांनी केलेले आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फेटाळून लावत, हे खरं नसल्याचे ते म्हणाले. यामध्ये जर कोणी दोषी असेल तर 15 दिवसांत कारवाई करणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. दरम्यान, केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्यात येतो. केशरी शिधापत्रिकांधारकांना 8 रुपये प्रती किलो गहू आणि 12 रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळते. 


महत्त्वाच्या बातम्या: