Solar Eclipse : 2022 या वर्षातील दुसरे आणि शेवटचे आंशिक सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज होत आहे. हे सुर्यग्रहण आज दिसले असले तरी ग्रहणाचा सुतक कालावधी मात्र काल रात्रीपासून सुरू झाला आहे. म्हणजेच सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या आधी 12 तास आधी सुरू झाला. सूर्यग्रहण भारतात दिसत असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध आहे. यामुळे ग्रहणाशी संबंधित सर्व धार्मिक मान्यता पाळल्या गेल्या. मंगळवारी सकाळी 11 वाजून 28 मिनिटापासून सूर्यग्रहण सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटापर्यंत हे सूर्यग्रहण राहणार आहे. पण भारतात हे ग्रहण 4 वाजून 49 मिनिटापासून दिसायला सुरुवात (स्पर्श) झाली आणि 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत राहिले. भारतात ग्रहणाचा मोक्ष काळ सूर्यास्तानंतरच आहे. राज्यभरात विविध भागातून आज नागरिकांमध्ये हे सूर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता पाहायला मिळाली.
मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तर ठाण्याच्या कोलशेत खाडी येथे नागरिकांसाठी विशेष सूर्यग्रहण बघण्याचे आयोजन करण्यात आले होते. Amature astronomy club यांच्यातर्फे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांना सोलार गॉगल देखील देण्यात आले होते.
रत्नागिरीमधून 20 टक्के सूर्यग्रहण दिसले. 4 वाजून 55 मिनिटांपासून 6.02 मिनिटांपर्यंत रत्नागिरीमधून सूर्यग्रहण दिसले. नागरिकांनी सूर्यग्रहण पाण्यासाठी गर्दी केली होती. रत्नागिरीमधून दिसणाऱ्या सूर्यग्रहणचा मध्यबिंदू 5.45 वाजता होता. रत्नागिरीमध्ये 6.09 वाजता सूर्यास्त झाला.
नागपूरमध्ये ग्रहण बघण्याची विशेष सोय
नागपूरच्या रमण सायन्स विज्ञान केंद्रामध्ये नागरिकांसाठी हे ग्रहण बघण्याची विशेष सोय करण्यात आली. टेलिस्कोपच्या माध्यमातून नागपूरकरांनी हे ग्रहण पाहिले. यावेळी ग्रहण बघण्यासाठी विशेष गॉगलची पण व्यवस्था येथे करण्यात आली होती.
शिर्डीत मुख्य दर्शन लाईन बंद
देशभरातील मंदिरात आज ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रथा असून शिर्डीच्या साईमंदिरात ग्रहण सुरू होताच मुख्य दर्शन रांग बंद करण्यात आली. मुख्य गाभाऱ्यात मंत्रोच्चार करण्यात आला. समाधी मंदिरात साईबाबांच्या समाधीवर तुळशीपत्र ठेऊन मंत्रोच्चाराला प्रारंभ झाला. आरती झाल्यानंतर मुख्य दर्शन रांग सुरू झाली.
वाशिममध्ये नागरिकांची गर्दी
वाशिम जिल्ह्यात खंडग्रास सूर्यग्रहण 5 वाजून 9 मी पासून दिसण्यास सुरूवात झाली. लोकांनी विशेष गॉगलच्या साह्याने हे ग्रहण पाहिले.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणाहून या वेळी दिसले सूर्यग्रहण
मुंबई : 4 वाजून 49 मिनिटे
पुणे : 4 वाजून 51 मिनिटे
नाशिक : 4 वाजून 47 मिनिटे
नागपूर : 4 वाजून 49 मिनिटे
सोलापूर : 4 वाजून 54 मिनिटे
औरंगाबाद : 4 वाजून 50 मिनिटे