Kolhapur Crime : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात शाॅर्टकटचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. फसवून आलीशान जीवनशैली जगण्याच्या या प्रवृत्तीने अनेकजण रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. 


जिल्ह्यात पहिली घटना ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीची उघडकीस आली. या कंपनीने कोल्हापूर सांगली, सातारा, बेळगावपर्यंत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या कंपनीने आतापर्यंत दुप्पट परताव्याचे आमिष, परदेश वारी अशी प्रलोभने दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. पोलिसांकडे जवळपास पावणे दोनशे जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला असला, तरी शहरातील कंपनीचे शाहूपुरी कार्यालयातील  कंपनीचे  फलक गायब झाले आहे. एजटांनी सुद्धा कलटी मारली आहे. त्यामुळे गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. दुर्दैवाचा फेरा म्हणजे यामधील अनेकांनी साठवलेली पूंजी शहानिशा न करता गुंतवून  रिकामे झाले आहेत. 


8 टक्के बोनसचे आमिष दाखवून 1 कोटी  76 लाखांची फसवणूक  


ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीची बनावटगिरी समोर असतानाच आणखी एक असाच प्रकार उघडकीस आला आहे. 8 टक्के बोनस आणि 18 महिन्यांनी मूळ रक्कम परत देण्याच्या आमिषाने तब्बल 1कोटी 76 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऑक्ट नाईन इन्व्हेस्मेंट सोल्युशन एलएलपी कंपनीचे कार्यालय राजारामपुरी तिसऱ्या गल्लीत आहे. या कंपनीने 8 टक्के बोनस आणि 18 महिन्यात मुळ रक्कम परत म्हणून आमिष दाखवले आहे. सेबी आणि आरबीआयकडून सर्व परवाने घेतल्याची खोटी माहिती सुद्धा त्यांनी दिली होती. मात्र, परतावाच न मिळाल्याने गुंतवणूकदाराने पोलिसांकडे धाव घेतली. 


आता हे दोन फसवणुकीचे समोर आले असतानाच करवीर तालुक्यातील एका गावामध्येही असाच गोरखधंदा सुरु असल्याचे समोर आले आहे. अडीच लाखांवर गुंतवल्यास एक तोळा सोन्याचे नाणे आणि गुंतवलेली रक्कम महिन्याला 50 हजार प्रमाणे परत दिली जाते, अशी माहिती समोर आली आहे. ही कंपनी पुण्यातून चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. 


हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक


दरम्यान, कोल्हापूरमध्ये ऑक्टोबर महिन्यात कमांडो हाफ मॅरेथॉन (kamando half marathon 2022) या स्पर्धेच्या आयोजनाच्या नावाखाली पैसे गोळा करून लाखोची फसवणूक करून वैभव पाटीलने आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या वैभवने राज्यासह देशभरातील साडेचार हजारांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून प्रवेश शुल्कच्या नावाखाली पैसे आकारले होते. स्पर्धेसाठी स्पर्धक कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याना फसवणूक झाल्याचे समोर आले होते. मुख्य आयोजक वैभव अचानक गायब झाल्याने शेकडो स्पर्धकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.


इतर महत्वाच्या बातम्या