रत्नागिरी : पाच दिवसांच्या गणपतीचं काल (17 सप्टेंबर) विसर्जन झाल्यानंतर, आज चाकरमानी मुंबईला येण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे अर्थात रेल्वेला प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. अशातच रत्नागिरी स्थानकात गोंधळ निर्माण झालाय. दादर पॅसेंजर प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकात रोखल्याचा प्रकार घडलाय.

दादर पॅसेंजर दादर ते सावंतवाडी दरम्यान धावते. सावंतवाडीवरुन सुटल्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकात पोहोचते आणि तिथून निघते. मात्र आज रत्नागिरीत प्रवाशांच्या गोंधळामुळे सुमारे दोन तास उलटल्यानंतरही दादर पॅसेंजर रत्नागिरी स्थानकातच अडकलीय.

सिंधुदर्गातून येतानाच दादर पॅसेंजर भरुन आल्याने, रत्नागिरी स्थानकातील प्रवाशी संतप्त झाले. जे डबे रत्नागिरीतल्या प्रवाशांसाठी राखीव होते, त्यातही सिंधुदुर्गातील प्रवाशी बसून आले होते. त्यामुळे त्यांनी खाली उतरावं, अशी मागणी करत रत्नागिरी स्थानकातील प्रवाशांनी पॅसेंजर रोखून धरली.

प्रवाशांचा संताप पाहता रत्नागिरी रेल्वे स्थानकात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाची धावपळ सुरु झाली. रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, प्रवाशांची समजूत काढण्याचे प्रयत्न करत आहेत. रोखून धरलेली पॅसेंजर सोडली नाही, तर प्रवाशांविरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले आहेत.