मुंबई : 'मला एटीएसने नग्न करुन मारहाण केली', अशी तक्रार नालासोपारा स्फोटकं प्रकरणी एटीएसच्या ताब्यात असलेला आरोपी सुजीतकुमारने सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात केली. बेल्ट आणि काठीने छताला लटकवून आपल्याला बेदम मारहाण केल्याचंही त्याने कोर्टाला सांगितलं.
कर्नाटक एसआयटीने अटक केलेला सुजीतकुमार हा सध्या एटीएसच्या कोठडीत आहे. सुजीतकुमारच्या तक्रारींची दखल घेत त्याची वैद्यकीय तपासणी चाचणी करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिलेत. सुजीतकुमारची पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी एटीएसकडून त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
नालासोपारा शत्रसाठा प्रकरणी एटीएसने जळगावातून अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी यांना सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. या दोघांनीही काही मोटरसायकल्सचे भाग वेगवेगळे करुन नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती एटीएसने कोर्टाला दिली.
या बाईक्स कर्नाटकातून चोरलेल्या होत्या. या बाईक्सचा वापर काही प्रसिद्ध व्यक्तींची रेकी करण्यासाठी करण्यात आला असल्याचा एटीएसला संशय आहे. त्याचप्रमाणे बीडमध्येही काही बाईक नष्ट करण्यात आल्या.
इलेक्ट्रॉनिक कटरने बाईक्स तोडल्या असा दावा एटीएसने केलाय. मात्र हे सारं कोणाच्या आदेशावरून त्यांनी होतंय हे शोधणं आवश्यक असल्याचं एटीएसने कोर्टात सांगितलं.
या आरोपींना चौकशीसाठी हुबळी, धारवाड, बेळगाव आणि सोलापूरला नेण्यात आलं पण त्यांनी हे कृत्य करताना ते नेमकं कुठे आणि काय केलं? याबद्दल आरोपींनी आमची दिशाभूल केली, असा आरोपही एटीएसच्यावतीने करण्यात आला.
हे दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात असल्याचं फोन कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झाल्याचंही एटीएसने सांगितलंय. तसेच हे आरोपी इतर कोणत्या गुन्ह्यात सामील आहेत का? याचाही तपास करायचा असल्याने एटीएसने त्यांची पोलीस कोठडी वाढवून मागितली. त्यानुसार कोर्टाने वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी यांच्यासह इतर आरोपींना 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
एटीएसकडून नग्न करुन मारहाण, आरोपीची कोर्टात तक्रार
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
17 Sep 2018 08:22 PM (IST)
बेल्ट आणि काठीने छताला लटकवून आपल्याला बेदम मारहाण केल्याचंही त्याने कोर्टाला सांगितलं. कर्नाटक एसआयटीने अटक केलेला सुजीतकुमार हा सध्या एटीएसच्या कोठडीत आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -