परभणी : परभणीत वारकरी आणि पोलिसांमधील वाद विकोपाला गेला आहे. पोलीस निरीक्षकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गंगाखेडमध्ये पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी रात्री 10 वाजता कीर्तन बंद केलं होतं. याच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक माछरे यांच्या निलंबनासाठी वारकऱ्यांनी मोर्चा काढला होता.
पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही विनापरवाना मोर्चा काढला, शिवाय पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यात खासदार संजय जाधव, रासप नेते रत्नाकर गुट्टे, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांचाही समावेश आहे.
गंगाखेड शहरातील इसाद रोड स्थित रामेश्वरनगर येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा सोहळा सुरू आहे. हा सोहळा पोलीस निरीक्षक सोहन माछरे व त्यांच्या सोबतच्या पोलीस कर्मचार्यांनी खंडित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत 29 जानेवारीला अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीने करण्यात आला. त्या निषेधार्थ संत जनाबाई मंदिर ते गंगाखेड तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढत पोलीस निरीक्षक यांचा निषेध व धिक्काराच्या घोषणा दिल्या होत्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी 31 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले असल्याने हा मोर्चा बेकायदेशीररित्या काढून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. तसेच या मोर्चादरम्यान पोलिसांबद्दल चुकीचे सांगून जनतेत पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यात आली, असा ठपका ठेवत पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दिलेल्या तक्रारीवरून 300 पेक्षा अधिक मोर्चेकर्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीत वारकरी आणि पोलिसांमधील वाद विकोपाला, 300 जणांवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jan 2019 02:44 PM (IST)
पोलीस निरीक्षकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गंगाखेडमध्ये पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी रात्री 10 वाजता कीर्तन बंद केलं होतं. याच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक माछरे यांच्या निलंबनासाठी वारकऱ्यांनी मोर्चा काढला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -