पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत माढा लोकसभा उमेदवारीबाबत संकेत मिळतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र या सभेत पक्षाच्या नेत्यांनी कोणतेही स्पष्ट संकेत न दिल्याने उमेदवारीचा गुंता अजूनच वाढला आहे.


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे माढ्याचे विद्यमान खासदार असून गेल्यावेळी मोदी लाटेतही मोहिते पाटील यांनी निसटता विजय मिळवत पक्षाची अब्रू राखली होती. मात्र गेल्या पाच वर्षात त्यांची भाजपशी जवळीक वाढल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतील नेत्यांमध्येही अस्वस्थता होती. यातच निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत त्यांनी मतदारसंघातील दौरे आणि गाठीभेटी सुरु केल्याने मोहिते पाटील गटात अस्वस्थता आहे.

यातच राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत प्रभाकर देशमुख यांचा फलटणपासून सक्रिय सहभाग नजरेत येत आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे हे मोहिते पाटील यांचे कडवे विरोधक असून मोहिते पाटलांना पुन्हा उमेदवारी दिल्यास आडकाठी येईल, असा कानमंत्र काही मंडळींनी बारामतीकरांना दिल्याचे बोलले जात आहे.

यामुळे प्रभाकर देशमुख उघडपणे उमेदवारीवर दावा करीत असल्याचे मानले जात आहे. यातच अकलूज वगळता इतर सर्वच कार्यक्रमात प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाडीत फिरल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढला आहे. अजित पवारांपासून धनंजय मुंडेंपर्यंत सर्वच नेत्यांनी माढ्याच्या जागेचा निर्णय पवारसाहेब करणार असून तुम्ही पक्षाच्या प्रचारास सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता माढ्याचा उमेदवार कोण? याचा गुंता जास्तच वाढला आहे.