परभणी : कोरोना काळात जरी शाळा बंद झाल्या, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला हे खरं असलं तरी याच काळात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम देखील ग्रामीण भागात बघायला मिळाले. शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम यामुळे झाला नाही.अशीच एक गृहपाठ फलक नावाची संकल्पना परभणीच्या कात्नेश्वर गावातील शिक्षकांनी राबवलीय. 


परभणीच्या पूर्णा तालुक्यातील 5000 हजार लोकसंख्येचं कात्नेश्वर गाव. गाव मोठं असल्याने विद्यार्थी संख्याही जास्त त्यामुळे गावात एक जिल्हा परिषद शाळा आणि 2 खाजगी शाळा. परंतु कोरोनामुळे मागच्या दीड वर्षापासून गावातील शाळा बंद.मोबाईलद्वारे ऑनलाईन क्लासचा पर्याय आला मात्र ग्रामीण भागात सर्वांकडेच मोबाईल नसल्याने अनेकांचे शिक्षण बंद पडले.याचाच विचार करून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजू पांचाळ यांनी गृहपाठ फलक संकल्पना राबवण्याचे ठरवले आणि गावातील प्रत्येक भागात एक-एक करत तब्बल 35 फलक लावले. रोज सकाळी ते त्यांच्या घरातील फलकावर गृहपाठ लिहून त्याचा फोटो काढून काही पालकांच्या मोबाईल पाठवतात मग गावातील त्या त्या भागातील ठरवून दिलेले विद्यार्थी,पालक तो गृहपाठ त्या फलकावर लिहितात त्यावरून दिवसभर याच फलकांच्या माध्यमातून गावातील तब्बल 290 विद्यार्थी अभ्यास करतात.. 
 
गावात लावलेल्या या फलकामुळे त्या त्या भागातील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्वयं अध्ययनाचे गट तयार झाले. मग काय कुणाचा गट गल्लीत, कुणाचा ओट्यावर तर कुणाचा बाजेवर बसून अभ्यास करु लागला. दुसऱ्या दिवशी त्या त्या विषयाचे शिक्षक येऊन या विद्यार्थ्यांचा गृहपाठ चेक करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा सुरळीत सुरूय. गावातील चिमुकली मंडळीही यामुळेच भाषणं, कविता,धडे मग ते इंग्रजीतून असो की हिंदी कि मराठीतून धडाधड म्हणून दाखवतात.  


अजूनही कोरोना संक्रमणाचा काळ सुरु आहे. तिसऱ्या लाटेत लहानग्यांना संसर्ग होण्याची भीती असल्याने पालक रिस्क घ्यायला तयार नाहीत, शाळा बंदच आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडतेय. शिवाय विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत.मात्र या कात्नेश्वर गावात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम झालेला नाही. उलट आपल्या डोळ्यासमोर पालक या मुलांकडून अभ्यास करून घेत आहेत. म्हणून या गृहपाठ संकल्पनेमुळे पालक देखील खुश आहेत. 


जर आपण ठरवलं तर काहीही शक्य होत हेच या कात्नेश्वर गावातील शिक्षक,विद्यार्थी आणि पालकांनी करून दाखवलंय. इतर ठिकाणी शाळा सुरु होण्याची वाट पहिली जात असताना इथल्या गृहपाठ फलक संकल्पनेने विद्यार्थ्यांच्या सिलॅबस पूर्ण झालाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने या संकल्पनेचे कौतुक करायला हवे.