नागपूर : नागपूर महानगर पालिकेच्या लघु सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलं. शंकरनगर परिसरातील बगिच्यात हा उभारला आहे. लघु सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नागपुरातील या प्रकल्पाला जपान सरकारनं मदत केली आहे. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, माझं स्वप्न आहे नाग नदी स्वच्छ करून मला त्यात बोट चालवायची आहे. खेळाची मैदान आता चांगली झाली त्यात आणखी सुधार करू, या मैदानाना मोफत पाणी मिळालं पाहिजे. 120 खेळाची मैदान आहेत. त्यात आणखी भर टाकायची आहे, असं ते म्हणाले.
गडकरी म्हणाले की, नागपुरातील पेट्रोल डिझेलचे पंप बंद करून सीएनजी आणि एल एन जी आणायचं आहे. पेट्रोल सोडून इथेनॉल वर चालणारी वाहन येत आहेत. माझं स्वप्न आहे ग्रीन हायड्रोजन वर सगळं चाललं पाहिजे , जनरेटर पासून सगळं त्यावर चालेल त्यासाठी नागपूर महापालिकेने प्रयत्न करावे. ते घाण पाण्यापासून तयार होऊ शकते. मी या आधी यासाठी प्रयत्न केला मात्र त्यात यश आलं नाही मात्र मी अजूनही त्यामागे लागलो आहे. मला नागपूर हे ग्रीन शहर करायचं आहे. देशात घाण पाण्यापासून पैसे कामविणारी पहिली महापालिका नागपूर आहे. त्याचप्रमाणे आता ग्रीन हायट्रोजन तयार करणारी महापालिका करायची आहे. यातून पर्यावरणाच रक्षण होणार आहे, असं गडकरी म्हणाले.
महापालिकेकडे झाड लावण्याची योजना आहे त्यानुसार दरवर्षी 5 लाख झाड लावायची आहेत. ध्वनी ,जल आणि वायू प्रदूषण दूर करण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न करून नागपूरला यापासून मुक्ती द्यायची आहे. मंत्र्यांच्या गाड्यांचे हॉर्न मी काढून टाकले आहेत. नुसते वाजवत ध्वनी प्रदूषण करत होते. आता फक्त अॅम्बुलन्सला हॉर्न आहेत, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, तुम्ही सुरू केलेले प्रकल्प बंद पडता कामा नये. मी त्यावर स्वतः लक्ष ठेवतो. मला ती सवय आहे. मी झाडापासून सगळीकडे लक्ष ठेवतो. माझा टॅक्टर मी सीएनजी वर केला तो पहिला सीएनजी ट्रॅक्टर आहे. मी तुम्हाला मोफत देतो, त्याचा या कामासाठी वापर करा, असंही गडकरी म्हणाले,
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिशय चांगला कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. नाल्यातून वाहून जाणार पाणी स्वच्छ होत आहे. जपान सरकारने यासाठी मदत केली. कमी खर्चात मोठ्या प्रमाणात स्वच्छ होत आहे . यामुळे प्रदूषण सुद्धा कमी होईल. गंगा स्वच्छ झाल्याचं आपण बघितलं त्याच प्रमाणे हे काम सुद्धा होत आहे, असं ते म्हणाले.