Parbhani News : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 49 वी बैठक परभणीत ऑनलाईन पद्धतीने पार पडली आहे. ज्यात चारही कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या पिकांचे 9 वाण, 15 कृषी अवजारं आणि 195 शिफारशींना मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली असून यावेळी दादाजी भुसे यांनी 2022 हे वर्ष जागतिक पातळीवरील उपयुक्त, असे कृषी संशोधन राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होईल यासाठी चारही कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावं असं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाची असलेली संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 49 वी बैठक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 30 डिसेंबर दरम्यान आभासी माध्यमातून घेण्यात आली आहे. बैठकीला कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्यासह अनेक महत्वाची अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी बोलताना बदलत्या हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यावर संशोधन करून संरक्षित शेतीवर भर द्यावा तसेच येणारे वर्ष 2022 हे वर्ष शासन महिला शेतकरी आणि महिला शेतमजुर वर्ष म्हणून साजरे करणार आहे. त्याकरिता शेतकरी महिला आणि महिला शेतमजूर यांना उपयुक्त कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रशिक्षण यावर भर देण्यात येणार असल्याचं सांगत जागतिक पातळीवरील उपयुक्त असे कृषी संशोधन राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठानं प्रयत्न करावा, असा सल्लाही कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठेचे प्रतिकुलपती दादाजी भुसे यांनी दिला आहे.
एक आठवडा चाललेल्या बैठकीत राज्यातील चारही कृषी वि़द्यापीठातील 300 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. सदर बैठकीत चारही कृषि विद्यापीठांच्या 9 विविध पिकांच्या नवीन वाण, 15 कृषी अवजारे आणि यंत्र आदीसह एकूण 193 संशोधन शिफारशींना मान्यता देण्यात आली, तसेच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था, मांजरी यांचा द्राक्षाचा मांजरी किशमिश वाण आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचा डाळिंबाचा सोलापूर लाल या वाणास मान्यता देण्यात आली आहे.
चारही कृषी विद्यापीठांनी मान्यता दिलेले शेती पिके आणि फळ पिकांचे वाण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे 3 विकसित वाणांना लागवडी करिता मान्यता देण्यात आली, ज्यात सोयाबीनच्या एमएयु-725, करडई पिकांचा परभणी सुवर्णा (पीबीएनएस-154) आणि रब्बी ज्वारी हुरडाच्या परभणी वसंत (पीव्हीआरएसजी-101) वाणास मान्यता देण्यात आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, उडीदाच्या फुले वसु, तीळाच्या फुले पुर्णा तर ऊसाच्या फुले-11082 या वाणास लागवडीकरिता मान्यता देण्यात आली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विकसित भात पिकांची पीडीकेव्ही साधना आणि रब्बी ज्वारी हुरडाची ट्रॉम्बे अकोला सुरूची वाणास मान्यता देण्यात आली. फळपिकात महात्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधीत पेरू फळाच्या फुले अमृत तर चिंचाच्या फुले श्रावणी वाणास मान्यता देण्यात आली, तर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था, मांजरी यांचा द्राक्षाचा मांजरी किशमिश वाण आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचा डाळिंबाचा सोलापूर लाल या वाणास मान्यता देण्यात आली आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा