परभणी : ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी जोडणारे रस्ते, नदी नाल्यांवरील पुल झालेले नाहीत. यामुळे दर वर्षी अनेकांना आपला जीव गावावा लागतो. अशीच घटना आज पुन्हा परभणीच्या पाथरी तालुक्यात घडलीय. चाटे पिंपळगाव-बाभळगाव मार्गावरील पुल झालेला नाही. त्यामुळे सध्या इथे जायकवाडीच्या कालव्याचे पाणी साचलेले आहे. यातून मार्ग काढणारे शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात पाण्यात कोसळले. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि 6 जणांचे जीव वाचवले आहे.ज्यात 2 लहान मुलांचा समावेश आहे.
पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव ते बाभळगाव रस्त्यावर चाटे पिंपळगाव जवळ पूल आहे. या पुलाचे काम झाले नसल्याने रेणापूर गावाकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी चाटे पिंपळगावच्या पुलाला येते सध्या जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्याचे पाणी या पुलाला आले आहे. त्यामुळे चाटेपिंपळगावच्या शेतकऱ्यांना याच पाण्यातून मार्ग काढूण शेतात जावे लागते.
चाटे पिंपळगाव येथील शेतकरी सखाराम पारटकर हे आपला मुलगा, सून आणि नातवांना घेऊन शेताकडे बैलगाडीतून निघाले होते. चाटे पिंपळगाव-बाभळगाव रस्त्यावरील पुलावर गाडी घातली मात्र पुलाचा रस्ता खराब असल्याने पुलावरील गाडी बैलांसह सर्वच कुटुंब पाण्यात पडले. त्यांचा आरडाओरडा ऐकून या रस्त्याने जाणारे शेतकरी हनुमान बोबडे व ज्ञानेश्वर काळे यांनी पाण्यात उडी घेऊन सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर गावातील इतर मंडळी मोठ्या प्रमाणावर जमा झाली व पाण्यात बुडालेली बैल गाडी बाहेर काढली.
या शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानतेने शेतकरी सखाराम पारटकर, त्यांचा मुलगा आसाराम पारटकर, सुन गीता आसाराम पारटकर, नात अपुर्वा आसाराम पारटकर 5 वर्षे व अनन्या आसाराम पारडकर 3 वर्षे या सर्वांचे प्राण इथे वाचले. मागच्या वर्षी ही अशाच प्रकारे इथे बैलगाडी वाहून गेली होती ज्यात बैलजोडीच्या मृत्यू झाला होता. त्यामुळे हा पुल तात्काळ करून देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केलीय.