Parbhani Bus Travels Accident : परभणी जिल्ह्यातील (Parbhani News) परळी गंगाखेड महामार्गावर (Parali Gangakhed road) सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. काल मध्यरात्री बस आणि ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून यातील दहा प्रवाशांना जास्त मार लागल्याने त्यांना अंबाजोगाई नांदेड व परभणी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
गंगाखेड-परळी महामार्गावरील करम पाटीवर काल मध्यरात्री नांदेडकडून पुण्याकडे जाणाऱ्या माऊली ट्रॅव्हल्स आणि बसमध्ये जोराची धडक जोराची धडक झाली. ज्यात दोन्ही वाहनांतील 25 प्रवासी हे जखमी झाले. घटनेची माहिती कळताच गंगाखेड पोलीस घटनास्थळी पोचले व त्यांनी तात्काळ जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र यातील काही जणांना जास्त मार लागल्याने प्रथमोपचार करून यातील 10 जणांना नांदेड, अंबाजोगाई आणि परभणीत पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताचे कारण मात्र कळू शकले नाही.
परळी-गंगाखेड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
परळी गंगाखेड महामार्गावर अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. एकीकडे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि दुसरीकडे पाऊस पडत असल्यामुळे चिखल होतोय. यातच वाहनधारकांना गाडी चालवणे मुश्किल झालेले आहे. या महामार्गावर रोज विविध अपघात घडत आहेत. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर दुसरीकडे कित्येक जण जखमी होत आहेत. याकडे ना प्रशासन लक्ष देते ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे.
उपजिल्हा रुग्णालयात 4 पथकांनी केले औषधोपचार
काल मध्यरात्री झालेल्या अपघातात 25 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याने त्यांना एकापाठोपाठ एक गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात येत होते. त्यामुळे या सर्व जखमींवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी या ठिकाणी चार विविध पथकं करण्यात आली. या चार पथकातील डॉक्टर, नर्सेस यांनी तात्काळ या जखमींवर उपचार केले. तसेच ज्यांना जास्त लागलेले आहे, अशांना इतर ठिकाणी हलवण्यात आले.