मुंबई : चांदिवाल आयोगासमोर होणारं भेटीगाठींचं सत्र थांबावं आणि उगाच कुठल्या आरोपांत अडकू नये यासाठी या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या सचिन वाझे आणि आरोपी अनिल देशमुख यांना आता वेगवेगळ्या दिवशी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगानं आता सचिन वाझेला 8 डिसेंबर तर अनिल देशमुखांना 9 डिसेंबरला सुनावणीसाठी हजर करण्याचे निर्देश दिलेत.


दरम्यान, बुधवारच्या सुनावणीतही अनिल देशमुखांच्या वकिलांनी वाझेची उलट तपासणी घेतली. ज्यात, 'आपण कामा व्यतिरिक्त कधीही तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना भेटलेलो नाही'. असं वाझेनं स्पष्ट केलं. सचिन वाझेची पुढील उलटतपासणी आता 13 डिसेंबरला घेण्याचं आयोगानं निश्चित केलं आहे.


सोमवारी आयोगात झालेल्या वाझे-परमबीर भेटीनंतर मंगळवारी वाझे-देशमुख यांच्यातही भेट झाली. अनिल देशमुख आणि सचिन वाझे दोघंही चांदिवाल आयोगापुढे हजर झाले होते. सकाळच्या सत्रात आयोगाच कामकाज स्थगित होताच दोघे एकाच खोलीत जवळपास 10 मिनिटं होते. तसेच आयोगाचं कामकाज संपल्यानंतरही काही तासांकरता ते सुनावणीच्या दालनात एकत्र होते. आयोगाचं कामकाज संपल्यानंतर न्यायमूर्ती चांदिवाल यांनी अनिल देशमुखांना तिथं आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची तसेच एकत्र जेवण्याचीही परवानगी दिली होती. मात्र या भेटींबाबत माध्यमांत आलेल्या वृत्तांवर आक्षेप घेत परमबीर यांच्या वकिलांनी एक अर्ज कोर्टात सादर केला. त्याला अनिल देशमुखांच्या वकिलांनीही दुजोरा दिला. मात्र बुधवारची सुनावणी संपताना हा अर्ज मागे घेण्यात आला.


परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राद्वारे केलेल्या भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांची हे आयोग समांतर चौकशी करत आहे. के. यू. चांदिवाल या हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी सुरू आहे. आयोगातर्फे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं न्यायालयीन कोठडीत पाठवलेल्या अनिल देशमुखांना सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी हजर करण्यात आलं होतं.


संबंधित बातम्या :