Anil Deshmukh and Sachin Vaze Meet : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) चांदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी हजर राहिले होते. यावरुन अनेक चर्चा रंगल्या होत्या. याप्रकरणाची चौकशी करण्याचेही आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. अशातच आज सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यातही भेट झाल्याचं बोललं जात आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझे चांदीवाल आयोगाच्या कार्यालयाबाहेर एकाच  खोलीत जवळपास 10 मिनिटं होते. एकाच प्रकरणात चौकशीच्या फेरीत अडकलेल्या सिंह, देशमुख आणि वाझे यांच्यातील भेटीगाठींच्या सत्रामुळं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. त्यावेळी चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये तब्बल एक तास संवाद झाला. एका खोलीत तब्बल एक तासासाठी त्यांचं बोलणं झालं. पण यावेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं ते कळू शकलेलं नाही. दरम्यान परमबीर आणि सचिन वाझेंच्या (Sachin Vaze) भेटीवर अनिल देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. अशातच आज अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा झाली. 


परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची चौकशी मुंबई पोलीस करणार आहे. मुंबई पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना भेटीसाठी अधिकृत परवानगी होती की, नाही? याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. जर अशी अधिकृत परवानगी नसेल तर या दोघांची भेट कशी झाली? याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. तसेच यासंदर्भात सचिन वाझेंना चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यासाठी घेऊन येणाऱ्या पथकाचीही चौकशी केली जाईल. 


चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी चांदीवाल आयोगानं परमबीर सिंहांना बजावलेलं जामीनपात्र वॉरंट रद्द केलं आहे. परंतु, आयोगासमोर हजर राहण्यापूर्वी परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवादही झाला. पण त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं ते कळू शकलं नाही. काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणानं वेगळं वळणंही घेतलं. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. तर 100 कोटींच्या वसुलींच्या आरोपानंतर परमबीर सिंह आणि अनिल देशमुख चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनाही ईडीकडून अटक करण्यात आली आहे. 


दरम्यान, या तिघांमधील भेटीगाठीच्या सत्रामुळं सध्या राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. परवानगीविना या भेटीगाठीच्या सत्रांमागे नक्की शिजतंय काय? असा प्रश्नही सध्या उपस्थित केला जात आहे. 


परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील भेटीची चौकशी, मुंबई पोलिसांना आदेश : गृहमंत्री


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांची तब्बल एका तासासाठी भेट झाली होती. यासंदर्भात बोलताना या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच परमबीर सिंह ज्या गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे, याप्रकरणीही चौकशी करण्यात येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "कालची भेट अत्यंत चुकीचं आहे. कोर्टच्या आदेशानंतर अशी भेट घेता येते. मात्र अशी कुठलीही परवानगी नसताना ही भेट झाली आहे. या परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची नक्कीच चौकशी करण्यात येईल." पुढे बोलताना ते म्हणाले की, "ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत. ते चुकीचं आहे. ते कामावर नाहीत त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील ते गाडी वापरत आहेत. हे  चुकीचं आहे चौकशीचे आदेश दिले आहेत."


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा