पनवेल : पनवेलकरांचं 25 वर्षांचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे. देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळखलं जाणारं पनवेल आजपासून महापालिका म्हणून ओळखलं जाणार आहे. शिवाय, आता पनवेल महापालिका की नगरपालिका, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पनवेल राज्यातील 27 वी, तर रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका ठरली आहे.


आयुक्त, उपायुक्त कोण?

आधीची पनवेल नगरपालिका आणि अधिकची 29 गावं मिळून पनवेल महापालिका अस्तित्त्वात आली आहे. नगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये सरकारकडून आज आयुक्तांची नियुक्ती करण्यात येईल आणि आयुक्तच प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश चितळे महापालिकेचे नवे उपायुक्त असतील.

पहिला दिवस कसा असेल?

महापालिकेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची कागदपत्रे पहिल्या दिवशीच महापालिकेकडे सोपवली जातील. कारण आता ग्रामपंचायती संपुष्टात येऊन सर्व भाग महापालिका क्षेत्रात येईल. ग्रामपंचायती कार्यलये, कर्मचारीही महापालिकेकडे हस्तांतरित होतील.

पनवेल नगरपालिका ते पनवेल महापालिका

देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असेलल्या पनवेल नगरपालिकेची स्थापना 25 ऑगस्ट 1852 रोजी झाली. वाढत्या शहरीकरणामुळे पनवेलचं आता महापालिकेत रुपांतर करण्यात आले आहे. खरंतर महापालिका करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासूनची होती. मात्र, अखेर पनवेलकरांच्या मागणीला न्याय मिळाला. राज्यातील 27 वी आणि रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून पनवेल ओळखले जाणार आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोणता परिसर येणार?

नवीन महापालिकेमध्ये नगरपालिका, पनवेल तालुक्यातील 29 गावं, तळोजा एमआयडीसी परिसर समाविष्ट होणार आहे.

महापालिका अस्तित्वात आल्याने पनवेलकरांनी आनंद व्यक्त केला असून, विकासकामं झपाट्याने होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिडको कार्यक्षेत्र, गावठाण परिसरामध्ये ठप्प असणारी कामे मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

राज्यातील 27 महापालिका :

मुंबई-ठाणे विभाग

मुंबई
ठाणे
नवी मुंबई
पनवेल
मीरा-भायंदर
कल्याण-डोंबिवली
उल्हासनगर
भिवंडी-निजामपूर
वसई-विरार

पश्चिम महाराष्ट्र विभाग

पुणे
पिंपरी-चिंचवड
सोलापूर
कोल्हापूर
सांगली-मिरज आणि कुपवाड

मराठवाडा विभाग

औरंगाबाद
नांदेड-वाघाळा
लातूर
परभणी

उत्तर महाराष्ट्र विभाग

नाशिक
मालेगाव
अहमदनगर
जळगाव
धुळे

विदर्भ विभाग

नागपूर
अमरावती
अकोला
चंद्रपूर