मुंबई: आजपासून नवरात्र उत्सवाला सुरवात होत आहे. नऊ रात्रींच्या या उत्सवाचा जागर करण्यासाठी राज्यातील सर्वच शक्तीपीठांची मंदिरे सज्ज झाली आहेत. आज मंदिरांसह घरोघरी होणाऱ्या देवीच्या स्थापना केली जाणार आहे.


महाराष्ट्रात तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण, तर नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते. त्यामुळं महाराष्ट्रात नवरात्रीला विषेश महत्त्व आहे. आजपासून येथे मोठ्याप्रमाणावर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.

सप्तश्रुंगीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा

आज सकाळी नाशिकच्या वणी गडावर सप्तश्रृंगी देवीची अलंकार महापुजा करण्यात आली. महापुजेनंतर सप्तश्रृंगीच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावलेल्या आहेत. नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून, पुढचे नऊ दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आली.

रेणुका देवीच्या दर्शनासाठी विशेष सोय

माहूर नगरी नवरात्रौत्सवासाठी माहुरगडावर जय्यत तयारी झालीय.भाविकांच्या सोयीसाठी गडावर जाण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तसंच दर्शन मार्गावर सगळीकडे स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. जेणेकरून भाविकांना रांगेत असतानाही रेणुका देवीचं दर्शन घेता येईल. गडावर 24 तास रुग्णालय आणि रुग्णवाहिकेची देखील सोय करण्यात आली आहे. दर्शन घेऊन बाहेर पडण्याच्या मार्गावर मंदिर संस्थान तर्फे अन्नछत्र चालवण्यात येणार आहे.

मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था

मुबंईच्या महालक्ष्मी आणि मुंबादेवी दर्शनासाठीही आज सकाळपासून मोठी गर्दी झालीय. देशभरात हायअलर्ट मिळाल्यानं या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आलीय. तसंच भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी अधिक खबरदारीनं राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय.

दरम्यान, नवरात्रीच्या काळात तरुणाईला दांडिया आणि गरब्याचे वेध लागतात. आजच्या घटस्थापनेपासून राज्यातील विविध भागांमध्येही दांडिया आणि गरब्याचे कार्यक्रम सुरु होत आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.