बीड : भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेतला. या दसरा मेळाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तर दुसरीकडे दसऱ्याला गजबजून जाणाऱ्या भगवानगडावर शुकशुकाट दिसून आला.


भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केल्यानंतर प्रशासनानेही परवानगी नाकारली. गडावर जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राम शिंदे मुंडे समर्थकांच्या निशाण्यावर आले आहेत. या सर्व वादात त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. परिणामी त्यांना सावरगावात मुंडे समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

सावरगाव दसरा मेळाव्यात राम शिंदेंविरोधात घोषणा

सावरगावात पंकजा मुंडे यांनी राम शिंदे यांचं नाव घेताच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्काराच्या वेळी राम शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करताच मुंडे समर्थकांनी विरोध केला. एकूण परिस्थिती पाहता राम शिंदे यांनी दसरा मेळाव्यात भाषणही केलं नाही.

राम शिंदे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अगदी जवळच्या नेत्यांपैकी एक होते. राम शिंदेंची राजकीय मुहूर्तमेढ रोवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राम शिंदे यांनी काही तरी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा मुंडे समर्थकांना होती. मात्र राम शिंदे या सर्व प्रकरणापासून दूर होते.

दरम्यान यापूर्वीही राम शिंदे मुंडे समर्थकांच्या निशाण्यावर आले होते. पंकजा मुंडे यांच्याकडे असलेलं जलसंधारण खातं राम शिंदे यांच्याकडे देण्यात आलं. त्यानंतर राम शिंदेंना मुंडे समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

राम शिंदेंना राजकीय फटका?

राम शिंदे हे भाजपमधील मुंडे गटाचे नेते आहेत. गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांना असलेल्या जनाधाराचा राम शिंदेंना मोठा राजकीय फायदा झाला. राम शिंदेंच्या मतदारसंघात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणातून दूर राहिलेल्या राम शिंदेंना मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडेंचं शक्तीप्रदर्शन

दसरा मेळावा आणि भगवानगड हे एक समीकरण होतं. त्यामुळे भगवानगडावरच आणि शक्य नसल्यास पायथ्याला दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी होती. मात्र दसऱ्याला एक दिवस बाकी असताना संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत मेळावा घेण्याचा निर्णय झाला. भाविक भगवानगड सोडून मेळाव्याला येणार नाहीत, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे गर्दी नसेल, असा अंदाज लावला जात होता. मात्र पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. एक दिवस अगोदर निर्णय होऊन मोठ्या प्रमाणात भाविक आणि मुंडे समर्थक भगवान बाबांच्या जन्मभूमीत दाखल झाले. बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांच्या नेतृत्त्वात गोपीनाथ गड (परळी) ते सावरगावपर्यंत रॅली काढण्यात आली. हजारो गाड्यांचा ताफा सावरगावात दाखल झाला.

भगवानगडावर दसऱ्याला पहिल्यांदाच शुकशुकाट

1965 साली संत भगवान बाबांनी गडावर शस्त्रपूजन करून गडाच्या आजूबाजूच्या 25 गावातील भक्तांनी एकत्र येऊन गडावर दसऱ्याच्या दिवशी उत्सव सुरु केला. पुढे हीच परंपरा महंत भीमसेन महाराजांनी 38 वर्षे चालवली. 1993 साली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर पहिला मोठा सामाजिक कार्यक्रम घेतला.

तत्कालिन मठाधिपती भीमसेन महाराजांचं 2003 साली निधन झाल्यानंतर समाजाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंनी नामदेव शास्त्रींची गडाचे महंत म्हणून घोषणा केली. गोपीनाथ मुंडे होते, तोपर्यंत राज्यभरातील भगवान बाबांचे लाखो भक्त आणि मुंडे समर्थक गडावर यायचे. गोपीनाथ मुंडेंच्या पुढाकाराने राज्यातील दिग्गज या कार्यक्रमाला हजेरी लावत होते.

यावर्षी सावरगाव येथून दसरा मेळाव्याची नवीन परंपरा सुरु झाली. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच भगवान गडावर दसऱ्याला गर्दी दिसली नाही.

व्हिडिओ : पंकजा मुंडे यांचं सावरगाव दसरा मेळाव्यातील भाषण