बीड : केवळ मुलगी आहे म्हणून तिचा सांभाळ करण्यास नकार देण्याचा प्रकार गंभीर आणि निषेधार्ह आहे, असं म्हणत बीडमधील दाम्पत्यावर कारवाईचे संकेत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. ज्यांनी ‘त्या’ मुलीला स्वीकारण्यास नकार दिला, त्या कुटुंबावर कारवाई केली जाईल. हा सगळा प्रकार माणुसकी नसणारा आहे. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिलं.


मुलगा होता तेव्हा सांभाळण्याची परिस्थिती होती, मात्र मुलगी असल्याचं लक्षात आल्यावर परिस्थिती कशी काय बदलू शकते? असा प्रश्न उपस्थित करुन या प्रकाराबद्दल पंकजा मुंडेनी संताप व्यक्त केला.

बीड जिल्ह्यातील वडवणीतील थिटे दाम्पत्याचा आरोप होता, की आपल्याला मुलगा जन्माला आला, मात्र हाती मुलगी देण्यात आली. 11 मे रोजी या बाळाने बीडच्या जिल्हा रुग्णालयात जन्म घेतला. त्या नंतर चार-पाच दिवस या बळावर उपचार झाले. नंतर मात्र या बाळाला इथल्याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. इथे मात्र ही मुलगी असल्याची नोंद डॉक्टरांनी केली आणि मुलीच्या आई-वडिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. कारण, जिल्हा रुग्णालयाच्या नोंदीमध्ये या बाळाची नोंद मुलगा अशी करण्यात आली होती.

पोलिसात तक्रार केल्यानंतर हे दाम्पत्य ही मुलगी आमची नाहीच, यावर ठाम होतं. या नंतर आईने या मुलीला दूध पाजणं बंद केलं. चिमुकलीला झालेलं इंफेक्शन वाढत होतं, म्हणून या मुलीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं. इकडे पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास कसून करत होते. त्यासाठी डीएनए घेण्यात आले आणि तब्बल 19 दिवसानंतर ही मुलगी राजू आणि छाया थिटे यांचीच असल्याचं डीएनए अहवालात उघड झालं.

हा सगळा प्रकार धक्कादायक आहे, एकीकडे सरकार मुलींचा जन्मदर वाढावा, म्हणून काम करत असताना मुलगी झाली म्हणून सांभाळण्यास नकार देणाऱ्यावर कारवाई करून ती मुलगी त्यांच्याच ताब्यात देण्याचा प्रयत्न करू असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.