बीड : उध्दव ठाकरे यांच्याविषयी पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर नापास झालं आहे आणि सरकार नापास म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नापास असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. 


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कामगिरीवर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना त्या म्हणाल्या की, "राज्य सरकारचे विश्लेषण करायचं म्हटल्यावर उद्धव ठाकरे या व्यक्तीविषयी लोक चांगला विचार करतात. पण या सरकारविषयी चांगला विचार करत नाहीत. ठाकरे सरकार सर्वच पातळीवर नापास झालं आहे. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार नापास म्हटल्यावर मुख्यमंत्री ठाकरे हे नापास झाले आहेत."


राष्ट्रवादीला जास्त फायदा
भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, "या सरकारमध्ये एका पक्षालाच जास्त फायदा होतोय. मुख्यमंत्री एका पक्षाचे असले तरी सरकार हा दुसराच पक्ष चालवतोय. सर्वाधिक निधी हा राष्ट्रवादीला मिळतोय. त्यामुळे लाल फितीचा कारभार वाढला असल्याचं दिसून येतंय. या सरकारच्या काळात एकही नवीन योजना, लोकप्रिय योजना ही आतापर्यंत आली नसल्याचं दिसतंय. कोरोनाचे कारण दिलं जातंय पण आता कोरोना संपलाय. सरकार जनतेच्या हिताचं काम करत नाही."


गोपीनाथ मुंडे असताना भाजप आणि शिवसेना एकत्र होती. पण आता हे दोन पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू झालेत का असा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात कोणीही कोणाचं कायमचं मित्र वा शत्रू असतं असं नाही. या आधी दोन्ही पक्ष एकाच विचारधारेचे होते त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र होते. आता सध्या तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित आले आहेत. भविष्यात समान विचारांचे पक्ष एकत्रित येतील.


ओबीसीच्या प्रत्येक प्रश्नावर आपण सक्रिय असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. किरीट सोमय्या, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्याविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, या नेत्यांचा अजेंडा काही नकारात्मक नाही. पण जर हे नेते काही चुकीचं बोलत असतील तर पक्षीय पातळीवर त्याचा विचार केला जाईल. 


महत्त्वाच्या बातम्या: