मुंबई: राज्यात वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य लोड शेडिंगच्या दिशेने निघाले आहे. राज्यातील अनेक वीज निर्मीती केंद्रावर दोन ते तीन दिवस कोळसा पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे. वीज निर्मीतीमध्ये महत्वाच्या असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 17 ते 18 दिवस पुरेल इतकाच वीज निर्मितीचा पाणी साठा उपलब्ध आहे.
खाजगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. दररोज 20 ते 22 हजार मेगावॉट वीजेची राज्याला गरज असताना आता 28 हजार मेगावॉटची मागणी आहे. दोन दिवसात हीच मागणी 30 हजार मेगावॉटवर जाण्याची शक्यता आहे. लवकरच या निर्णयासाठी मंत्रीमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात भारनियमन वाढलं
वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असताना महावितरणने बीड जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा शॉक दिला आहे. विजेची वाढलेली मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन सुरु करण्यात आले आहे. आज रात्रीपासून बीड जिल्ह्यातील फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, लोडशेडींगचे वेळापत्रक बाबत अद्याप नियोजन झालेले नाही. ज्या भागातील वसुली कमी त्या भागात अधिकचे लोडशेडींग असा फॉर्म्यूला महावितरणने ठरवला असल्याची माहिती आहे.
देशात कोळशाचा पुरवठा अपुरा
दरम्यान, देशात यावर्षीही कोळशाचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळा ऋतू सुरू झाला असून अशा परिस्थितीत विजेची मागणी वाढली आहे. येत्या काळात विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोळशाचा साठा वीज प्रकल्पांमध्ये निर्धारित लक्ष्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे कोल इंडिया वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
देशातील ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा रविवारी 25.2 दशलक्ष टनांवर आला होता. जो कोळसा मंत्रालयाने निर्धारित केलेल्या 45 दशलक्ष टनांच्या लक्ष्यापेक्षा कमी होता.
दरम्यान, गुढीपाडव्यापासून घरगुती वीज ग्राहकांना महावितरणने दिलासा दिला असून वीजदर दोन टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकर वापरत असलेल्या टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी कमी होत असून, अदानींच्या दरात मात्र वाढ होणार आहे. बेस्टचे वीजदरही स्थिर राहणार आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha