मुंबई: चुकून एकदा यांचा विजय झाला, त्यांना तो विजय महागात पडणार आहे. आमच्या काही चुका झाल्या असतील, त्या चुका दुरुस्त करून पुन्हा आम्ही कामाला लागलो आहोत अशी जाहीर टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे. त्या धारूर बाजार समितीच्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.


धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी-मी म्हणणारं अहंकारी नेतृत्व जनतेला नको तर जनता-जनता म्हणणारं नेतृत्व हवं आहे. भविष्यात राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे त्यासाठी तयार राहा."


परळीत माझा फार्म हाऊस नाही, माझा महाल नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. मुंडे साहेबांनी जे कार्यालय सुरू केले होते आजही त्याच कार्यालयात मी बसते. मी कुठेही नवीन बंगला बांधला नाही किंवा फार्म हाऊस बांधला नाही असाही टोला त्यांनी लगावला. 


आजच्या राजकारणात सर्कस सुरू 
आजच्या राजकारणामध्ये जी सर्कस सुरू आहे त्या सर्कशीत आपण नाही याचं समाधान आहे असे सांगतानाच पंकजा मुंडे यांनी सगळ्या राजकीय नेत्यांना लोकहितासाठी भांडले पाहिजे असा सल्ला दिलाय. या काळात आपण विरोधी बाकावर नाही याचं सुद्धा समाधान वाटत आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.


पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जाहीर आरोप करून पंकजा मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्याची बदामी होते अशी टीका केली होती. याला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ज्या दिवशी बीड जिल्ह्याच्या बदनामीचे काम आपल्या हातून होईल तो आपला शेवटचा श्वास असेल. माझा संघर्ष हा राजकारणातील अपप्रवृत्तीच्या विरोधात आहे. राज्य करताना सात्विकपणे केले पाहिजे आणि युद्ध करताना ते पराक्रमी असले पाहिजे.


पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, कोणतंही पद मिळवण्यासाठी आपण कधीच राजकारणात आलो नाहीत. मी केवळ तुमच्यासाठी राजकारणात आहे. सत्तेच्या खुर्चीवर कोण बसेल याची चिंता कधीच मुंडे साहेबांनी केली नाही. मीही ती कधीच चिंता करत नाही. सत्ता असेल-नसेल, मी मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.


महत्त्वाच्या बातम्या: