Pankaja munde dasara melava at Savargaon : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आला होता. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. आजचा सोहळा खूप देखणा आहे, देशात असा सोहळा कुठे होत नसेल, असं म्हणाल्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडावर दाखल झाल्या होत्या. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांवर फुलं टाकत होते. तसेच, मी तुमच्या पायावरही फुलं टाकत होते. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आजची दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची जी परंपरा कायम ठेवण्यासाठी तुम्ही घरची पुरणपोळी सोडून इथे आले आहात, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पंकजा मुंडे मेळाव्यात बोलताना म्हणाल्या की, "आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा वाटू देऊ नका, अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते." असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. माझ्यामागे मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती आहे. हे अत्यंत पवित्र स्थान आहे. या स्थानावर उच्चार करायचा नाही, असा कुठलाही शब्द मी उच्चारणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्यानं भगवान बाबांची मान खाली जाईल, अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही. अशा कुठल्या प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही."
आपलं मंत्रिपद यांनी किरायानं दिलं : पंकजा मुंडे
"आपलं मंत्रिपद यांनी किरायाने दिलं. आमचं म्हणणे आहे तुम्ही चागंलं, जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीरपणे तुमचे अभिनंदन करु. पण सध्या राज्यात चाललंय काय? राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहे. महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही. आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?", असं म्हणत पंकजा मुंडे यांनी जाब विचारला.
दरम्यान, बीड जिल्ह्यात सावरगावच्या भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या. या काळातील संघर्ष आणि यश-अपयश या संदर्भात बोलणार आहे, असं सांगून पंकजा मुंडे यांनी उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर आज कोण असेल? याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. प्रीतम मुंडे यांची मंत्रिपदाची हुकलेली संधी, मुंडे समर्थकांमध्ये असलेली अन्यायाची भावना या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचं भाषण लक्षवेधी ठरणार आहे.
फेसबुकवरुन व्हिडीओ जारी करत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की...
फेसबुकवरुन एक व्हिडीओ जारी करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण सर्वजण कार्यक्रमासाठी उत्सुक आहोत. दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत. तुमचंही ऐकायचं आहे, मलाही बोलायचं आहे. या दोन वर्षात अनेक घटना घडल्या. या दोन वर्षात मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, अनेक संघर्ष, अनेक यश-अपयश याची सर्व कहाणी. तिथून आपण कोणती उमेद घ्यायची आणि भविष्याचा प्रवास कसा करायचा हा भाषणाचा सूर असेल. मी काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष आहे, माझंही लक्ष आहे, कारण मी जे काही बोलते ते स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने बोलते. भगवान बाबांच्या आशिर्वादाने आणि मुंडे साहेबांच्या संस्कारावर आधारीत बोलते. त्यामुळं आपण कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाला उपस्थित राहावं.
पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, "इथून आतापर्यंत आपण अनेक संकल्प केले आहेत. मुंडे साहेबांनी अनेक संकल्प केले होते, आपण ते तडीसही नेले. असेच संकल्प करण्यासाठी आपण दरवर्षी तिथं येतो. ती एक उर्जा आहे, एक शक्ति आहे, आपला अभिमान आहे. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे. आपण घरातून निघताना आपली शिदोरी घेऊन निघा. पाणी सोबत ठेवा. कार्यक्रमस्थळी आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा. कोरोनाचं संकट टळलं असलं तरी आपण काळजी घ्यायची आहे. आपण मास्क लावूनच यायचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यामुळं कुणाला होऊ नये याची काळजी घ्यावी."