मुंबई : राज्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. परिणामी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागात शनिवारी पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळाली. तर दाट धुक्यामुळे औरंगाबादमध्ये रेल्वेची गती मंदावली. तर, अनेक ठिकाणी महामार्गावर वाहनधारकांना वाट काढताना कसरत करावी लागत आहे. तर, पावसाबरोबरच धुक्याचे शेतीसमोर संकट उभे राहिल्याने शेतकरी चिंतेत आहे.
राज्यात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक भागांत धुक्याची चादर परसली आहे. वाढलेल्या थंडीमुळे ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.


औरंगाबाद -
औरंगाबाद शहरातील घनदाट धुक्यामुळे रेल्वेची गती मंदावली. सिग्नल दिसत नसल्यानं रेल्वे पाच ते दहा किलोमीटर प्रति वेगाने धावत आहे. तर काही काळ रेल्वे थांबवण्यात आली होती. मनमाड काचीगुडा पॅसेंजर(57562)धुक्यात ताशी 5-10 स्पीडने धावत आहे.
परभणी -
परभणी जिंतूर तालुक्यातील येलदरी हे धरण यंदा शंभर टक्के भरले आहे. त्यातच मागच्या 3 दिवस झालेल्या पावसामुळे आज या परिसराला अक्षरशः धुक्याने वेढले आहे. रोज पाण्यावर दिसणारा उगवता सूर्य आज या दाट धुक्यात अगदी हलकासा दिसत होता. शिवाय येलदरीचे विद्युत निर्मिती केंद्र, धरण परिसर आणि पाणीही या धुक्यात दिसेनासे झाले होते. महत्वाचं म्हणजे काठोकाठ पाण्याने भरलेल्या या परिसरातील पाण्यावरुनही धुक्याचे लोट उठत होते, हे डोळ्यात साठवून ठेवावे वाटणारे दृश्य पाहण्यासाठी आज पहाटे पासूनच या परिसरात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती.

सिंधुदुर्ग -
तळकोकणात तापमान 12℃ एवढ नोंदवले गेले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10℃ एवढं नोंदवले गेले आहे. त्यामुळे तळकोकण गेल्या दोन दिवसांपासून गारठू लागल आहे. जिल्ह्यात दाट धुक्याचं प्रमाणही असल्याने वाहनचालकांना धुक्यातून मार्ग काढावा लागत आहे. जिल्ह्यातील थंडीचं प्रमाण वाढल्याने नागरिकांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना पहायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी गरम स्वेटर घालुन नागरिक घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत.

वाशिम -
वाशिम जिल्ह्यात आज धुक्याचं प्रमाण कालपेक्षा अधिक दाट धुकं आहे. अवघ्या पाच फुटा वरचा माणूसही दिसणं कठीण झाला आहे. दाट धुकं असल्याने वाहन धारकांना वाहन अत्यंत कमी वेगाने चालवण्याची वेळ आली आहे. या धुक्यामुळे गारपीटपासून वाचलेले रब्बी पीक मात्र धोक्यात आले आहे.

पावसाबरोबरच धुक्याचे शेतीसमोर संकट - 
परभणीत मागच्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे आणि पडत असलेल्या धुक्यामुळे शेतीसमोरील संकट दाट होत चालले आहे. शिवाय या धुक्यामुळे महामार्गावरील वाहतुकिलाही फटका बसला आहे. परभणी-जिंतूर या 40 किलोमीटरच्या प्रवासाला तब्बल तीन तास लागत असल्याची प्रवाशांचे म्हणणे आहे. शिवाय रब्बीतील हरभरा, तूर, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आणखी किती दिवस हे असेच वातावरण राहणार हा प्रश्न शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पडला आहे.

हिंगोली -
जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही धुक्याची दाट चादर पसरली आहे. धुक्यामध्ये गाव, रस्ते आणि शहर हरवून गेले आहे. दाट धुक्यामुळे रस्त्यावरील वाहनांची गती मंदावली आहे. परंतु, सतत पडणाऱ्या धुक्यामुळे मात्र शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तूर पिकाच्या शेंगा देखील काळी पडून गळून जात आहेत. त्याचबरोबर हरभरा पिकाला देखील मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोबतच भाजीपाला पीक देखील धोक्यात सापडले आहे.