औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार  यांचं नाराजी नाट्य संपलं आहे. अब्दुल सत्तार नाराज नसल्याचं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली होती. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज असल्याचं बोललं होतं. अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याची जबाबदारी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली. अब्दुल सत्तार राजीनामा देणार नाहीत, असं अर्जुन खोतकर यांनी बैठकीनंतर सांगितलं.


अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाल्याचा दावा अर्जुन खोतकर यांनी केला आहे. सत्तारांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही, राजीनाम्याच्या केवळ अफवा आहेत. अब्दुल सत्तार उद्या उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. सत्तारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. सत्तार नाराज होते, जी काही नाराजी होती ती संपलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून यामधून तोडगा काढतील, अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली.


सत्तार यांच्या नाराजीची कारणे




  • अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांना अपेक्षा होती की, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल. मात्र त्यांना राज्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं आहे.

  • औरंगाबाद जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेकडे ठेवावी यासाठी अब्दुल सत्तार आग्रही होते. मात्र त्यांना स्थानिक नेत्यांनी काहीही विचारलं नाही, त्यामुळे सत्तारांची नाराजी होती.

  • सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे श्रीराम महाजन यांनी विधानसभेला काम केलं. त्याच श्रीराम महाजनांना जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचा सभापती केलं जात होतं त्यामुळेही सत्तार नाराज होते.


अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा


विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांना भाजपमध्ये जायचं होतचं. पण स्थानिक समीकरणांमुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेनेत पाठवल्याची चर्चा होती. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं, मात्र राज्यमंत्रीपद मिळालं. यामुळे अब्दुल सत्तार नाराज होते.