पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या विठ्ठल मंदिराचे रुपडे आता पालटणार आहे. ज्ञानोबा तुकारामांच्या काळातील मंदिर आता विठ्ठल भक्तांना पाहायला मिळणार आहे. नाही घडविला, नाही बैसविले असे विठुरायाच्या बाबतीत वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे या स्वयंभू विठुरायाच्या राऊळीला देखील त्याचे मूळ रूप देण्यासाठी एक आराखडा बनविण्याचे काम सुरु आहे. मंदिराला 700 वर्षापूर्वीचे मूळ रूप देताना रोज मंदिरात वाढत जाणारी गर्दी, संभाव्य धोके आणि अपघात याचाही विचार केला जाणार आहे. यासाठीच तयार होणाऱ्या आराखड्याची आज (गुरुवारी 8 जुलै) बैठक झाली. 


या बैठकीला मंदिर समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पुरातत्व विभागाच्या पॅनलवरील वास्तुविशारद श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागाचे पुरातत्व विभागाचे सहाणे हे उपस्थित होते. 


यासाठी मंदिराला नंतरच्या काळात दिले गेलेले घटक रंग, सिमेंट बांधकाम, चकचकीत फारश्या काढल्या जाणार असून पूर्वी जसे घडीव दगडी मंदिर होते ते स्वरूप आता दिले जाणार आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून पुरातत्व विभाग काम करीत असून त्यांचे वास्तुविशारद श्रीकांत देशपांडे यांनी मंदिराचे मूळ रूप देताना पुढील शेकडो वर्षापर्यंत मंदिर अबाधित राहण्यासाठी मंदिराचा स्ट्रक्चरल ऑडिटचे काम देखील हाती घेतले आहे.


यामुळे मंदिराला त्याचे मूळ रूप परत मिळणार असून नामदेव पायरी पासून विठ्ठल गाभार्यापर्यंत हे सर्व बदल केले जाणार आहेत. यासाठी हा सविस्तर विकास आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) अर्थात DPR बनविण्यात येत आहे. मंदिराचे काम बारा टप्प्यात केले जाणार असून यासाठी थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे श्रीकांत देशपांडे यांचे म्हणणे आहे. या सर्व कामला ढोबळ मानाने 40 ते 42 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून पुरातत्व विभाग आणि मंदिराच्या पुढील बैठकीत याचा पक्का आराखडा तयार झाल्यावर राज्य सरकारकडे हा आराखडा मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. या कामानंतर मंदिराचे आयुष्य देखील शेकडो वर्षांनी वाढणार असून मूळ विठ्ठल मूर्तीची झीज देखील कमी होण्यास मदत होण्याचा विश्वास पुरातत्व विभागाचे वहाणे यांना आहे. 


अशा पद्धतीच्या डीपीआरमुळे भविष्यात कोणत्याही मंदिर समिती आल्या तरी त्यांना मनमानी करता येणार नसून याच आराखड्यानुसार काम करावे लागणार असल्याने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे मंदिर समिती सदस्या अश्विनी निगडे याना वाटते आहे. मंदिराला मूळ रूपात आणण्याच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे भविष्यात भाविकांना विठुरायाचे ज्ञानोबा तुकारामांच्या काळातील मूळ मंदिरात आल्याचा आनंद घेता येणार असून आपले पूर्वीचे ऐतिहासिक वैभव पुन्हा अनुभवता येणार आहे. वास्तविक विठ्ठल मंदिर हे संत नामदेवांच्या आधीपासून म्हणजे 12 व्या शतकाच्या पूर्वीही असल्याचे नामदेवरायांच्याच अभंगातून सांगितले जात असले तरी पुरातत्व विभागाच्या दृष्टीने हे मंदिर 14 व्या शतकातील यादव काळातील असल्याचे मानले जात आहे. पूर्वी बडवे समाजाच्या ताब्यात असलेले मंदिर 1985 साली शासनाच्या ताब्यात आले असले तरी 36 वर्षात एकही मंदिराचा आराखडा बनला नव्हता. मात्र, आज मंदिराचा बनवलेला आराखडा भविष्यात विठ्ठल भक्तांना एक पर्वणी ठरणार आहे.