Pandharpur Vitthal Mandir : ज्ञानोबा तुकाराम आदि संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर कसे असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली असताना आता राज्य शासनाने यासाठी 30 नोव्हेंबर रोजी मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची बैठक आयोजित केल्याने आता लवकरच याच्या कामाला सुरुवात होण्याच्या आशा वाढल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आराखड्याची विशेष परिश्रम घेतल्याने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 73 कोटी 80 लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला होता . गेल्या वर्षी अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी 73 कोटी 80 लाखांची तरतूद केली होती. मात्र यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यावर काही अधिकाऱ्यांनी नव्याने दुसऱ्या आर्किटेक्चर कडून पुन्हा नव्याने आराखड्याचे काम सुरु केल्याने हा प्रकल्प रेंगाळणार अशी चिन्हे असताना राज्याच्या मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली यासाठीची हाय पॉवर समितीची बैठक 30 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बोलावल्याने आता लवकरच या कामाला सुरुवात होण्याच्या आशा वाढल्या आहेत.
विठुरायाच्या बाबतीत नाही घडविला नाही बैसविला ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. विठ्ठल मंदिर हे 11 व्या शतकातील असल्याचे अभ्यासक मनात असले तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे .
आता पुन्हा 700 वर्षापूर्वीचे मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार बनविण्यात आला आहे . या आराखड्याचे पाच टप्प्यात कामे केली जाणार असून यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथे दगडांची झीज झाली आहे अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केले जाणार आहे . याशिवाय मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे . विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणणार आहेत .
मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनवले जाणार
तिसऱ्या टप्प्यात नव्या पद्धतीने बांधलेले नामदेव महाद्वाराच्या आरसीसी काम पाडून तेथे मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनविले जाणार आहे . याशिवाय मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून मंदिराशेजारी एक स्काय वॉक बनविला जाणार आहे . अखेरच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा , वायरिंग आणि वातानुकूलित यंत्रणा याचे काम केले जाणार आहे . दोन वर्षांपूर्वी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या विकास आराखडा आणि इतर प्रश्नासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळत त्यासाठी 73 कोटी 80 लाखांची तरतूद देखील केली होती. आता शिंदे फडणवीस सरकारने हे काम तातडीने सुरु केले तर येत्या पाच वर्षात जगभरातील लाखो विठ्ठल भक्तांना 700 वर्षापूर्वीचे म्हणजे संत कालीन विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार आहे.
ही बातमी देखील वाचा