Pandharpur Rain Update: सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात (Pune Satara Rains Live) सुरु असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरण (Ujani Veer Dam) 100 टक्के भरल्याने भीमा आणि नीरा नदीत (Chandrabhaga Neera River) मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील मंदिरात पाणी शिरू लागल्याने येथील देवांच्या मूर्ती हलविण्यास सुरुवात झाली आहे. सध्या लागून आलेल्या सुट्ट्या आणि पवित्र श्रावण महिना सुरु असल्याने रोज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत आहेत.


चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन 


यातच विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागेत पाय धुवून आणि पात्रात नौकानयन करून भाविक आनंद घेत आहेत. सध्या वीर धरणातून 33 हजार क्युसेक विसर्गाने नीरा नदीत तर 30 हजार क्युसेक विसर्गाने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणात येणार पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पाणी सोडण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीर धरणातील नीरा नदीत सोडलेले पाणी संगम येथे भीमा नदीत मिसळत असल्याने या दोन्ही धरणांचे पाणी थेट पंढरपूरमध्ये येत असते. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातच पंढरपूरकरांवर पुराचा धोका संभवण्याची शक्यता आहे. 


सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ, नागरिकांना स्थलांतर सूचना 


सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागातील नागरिकांना स्पीकरवरून स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शिवाय कोयना धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे सांगली येथील आयर्विन नदीच्या पाण्याची पातळी 27 फुटांवर गेली आहे. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरून दिल्या जात आहेत. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटसह सिध्दार्थ परिसर, मगरमच्छ कॉलनी परिसरातील नदीकाठचा भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा


कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने पूर्वनियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8000 क्यूसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्यूसेक विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Sangli Flood: सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना