Pandharpur News: आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आषाढीची शासकीय पूजा केल्यावर पंढरपूरसाठी  सर्वंकष आराखडा बनविण्याची घोषणा केली आणि त्यातून सध्या पंढरपुरात रोज नवनवीन वाद समोर येऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अधिकारी वर्ग कामाला लागला आणि चक्क वाराणसी, तिरुपती अशा देवस्थानांच्या धार्मिक सहली देखील केल्या. या सहलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 13 हजार कोटींचा एक प्राथमिक आराखडा जाहीर करीत नागरिकांकडून सूचना मागवल्या. यानंतरच खऱ्या वादाला तोंड फुटले. मंदिर परिसरात रुंदीकरणाला विरोध करण्यासाठी पहिल्यांदा मंदिर परिसरातील व्यापारी आणि नागरिक उठून बसले. यासाठी त्यांनी एक दिवसाचा बंद देखील पाळला. या विरोधाला कारण देखील तसेच होते, 1982 साली सर्वात पहिल्यांदा मंदिर परिसरात रास्ता रुंदीकरणाची कामे झाली मात्र आज 40 वर्षांनंतरही यावेळी प्रस्थापित झालेल्या अनेकांना ना जागा मिळाल्या ना मोबदला. पूर्वीचा वाईट अनुभव असल्याने आता आपल्या घरादारावर रस्ता रुंदीकरणाचा बुलडोझर कोणालाच नको झाला आहे. त्यामुळे आराखडा करताना आधी नागरिकांना विश्वासात घ्या आणि ज्या ठिकाणी पूर्वी रुंदीकरण झाले तेथे पुन्हा रुंदीकरण नको ही या भागातील नागरिकांची मागणी आहे. 


चंद्रभागेकडे जाणारा महाद्वार घाट मोठा करण्याचा प्रस्ताव असल्याच्या विरोधात सध्या श्रीमंत होळकर संस्थान आणि श्रीमंत शिंदे सरकार संस्थान यांच्या पुरातन ऐतिहासिक वास्तूचा काही भाग पाडण्यात येणार असल्याचे समोर येताच आता धनगर समाजाने या पुरातन वास्तूची वीट जरी काढली तर रक्तपात होईल असा गंभीर इशारा शासनाला दिला आहे. चंद्रभागेच्या महाद्वार घाटावर या दोन ऐतिहासिक वास्तू आहेत. यातील होळकर वाडा हा अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांसाठी 1767 मध्ये बांधला होता. दोन एकर क्षेत्रावर असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या बांधकामासाठी सागवानी लाकूड त्याकाळात मध्यप्रदेशातून समुद्रमार्गे आणण्यात आले होते. दोन माजली असणाऱ्या या 125 खणी वाड्यात असणारे पुरातन रामाचे आणि हनुमानाच्या मंदिराचे या पाडकाम नुकसान होणार असल्याचा दावा व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर यांनी केला आहे. 


याच घाटावर दुसऱ्या बाजूला ग्वाल्हेरच्या शिंदे सरकार यांचा ऐतिहासिक वाडा आणि द्वारकाधीश मंदिर आहे . होळकर वाड्याप्रमाणेच हा वाडा देखील 125 खणाचा असून संपूर्ण दगडी बांधकामात तटबंदी मध्ये उभ्या असलेल्या या वास्तूलाही रस्ता रुंदीकरणाचा फटका बसणार आहे. तत्कालीन महाराणी बायजाबाई शिंदे यांनी 1849 मध्ये ही भव्य ऐतिहासिक वास्तू उभी केलेली आहे. तब्बल 168 वर्षांपूर्वी उभारलेल्या या तटबंदीच्या वाड्याला त्याकाळात सव्वा लाख रुपये खर्च करण्यात आला होता. आता या वास्तूला धोका झाल्यास ग्वाल्हेरचे शिंदे घराणे देखील हे सहन करणार नसून त्यामुळे महाद्वार घाट रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा घाट प्रशासनाला बाजूला ठेवावा लागणार आहे.  


नगरपालिकेत समाविष्ट होण्यास 8 गावांचा विरोध 


विकास आराखड्याला नुसता पंढरपूर शहरात विरोध होत नसून यामध्ये शहराशेजारील गोपाळपूर , शिरढोण , टाकळी , शेगाव दुमाला , वाखरी , कोर्टी आणि कासेगाव या गावांचा नगरपालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे . आता या मुद्द्यावर सर्वच गावातून नगरपालिकेत समाविष्ट होण्यास तीव्र विरोध होऊ लागला असून वाखरी गावाने तर विशेष ग्रामसभा बोलावून याच्या विरोधात एकमुखी ठराव संमत केला आहे . पंढरपूर शहराचा विकास देखील नीट न करू शकणाऱ्या नगरपालिकेची आम्हाला गरज नसून आम्ही आमच्या गावाचा सर्वपरी विकास करू शकतो अशी भूमिका या गावातून येऊ लागली आहे .   आपल्या गावाची ऐतिहासिक ओळख घालवून ग्रामस्थांच्या माथी करांचा बोजा टाकणार नाही. याशिवाय गावातील मोक्याच्या मोकळ्या जागांवर नगरपालिकेचा डोळा असून आमचा विकास करायचा असेल तर या 8 गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेम आणि त्यास निधी देऊन विकास करा अशी ठाम भूमिका वाखरी ग्रामस्थांनी घेतली आहे . 


अधिकाऱ्यांनी विकास आराखडा सादर करताना दाखवलेल्या घिसाडघाईमुळे आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकनांच्या दृष्टीने व्हिलन ठरू लागले असताना शासनाने पंढरपूरचा विकास करताना नागरिक, व्यापारी, वारकरी संप्रदाय आणि परिसरातील ग्रामपंचायतीना विश्वासात घेतले तरच खऱ्या अर्थाने विकासाचा आराखडा प्रत्यक्षात साकारू शकेल अन्यथा सध्या तरी विकास नको पण तुमचा आराखडा आवरा अशी म्हणायची वेळ पंढरपूरकरांवर आलेली आहे .