पंढरपूर : राज्यभर ठाकरे सेना Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) विरुद्ध भाजप (BJP)  आणि शिंदे सेना Shiv Sena (Balasaheb’s Shiv Sena) असा संघर्ष असताना पंढरपूरमधील मंदिर समितीमध्ये या दोन्ही पक्षात गोडवा अजूनही कायम असल्याचे चित्र सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे. आषाढीपूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ संपला पण  अजूनही नवीन समिती नसल्याने भाजप आणि उद्धव ठाकरे सेनेत गोडवा कायम  आहे. 


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप आणि शिवसेनेची ही मंदिर समिती नियुक्त झाली होती. त्यानंतर हे युतीचे सरकार जाऊन आघाडीचे सरकार आले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने  अडीच वर्षाचा कालावधी देखील पूर्ण केला. दरम्यान आघाडी सरकारच्या काळात या मंदिर समितीची मुदत संपली नसल्याने नवीन समितीची नियुक्ती करण्यात आली नाही. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड होऊन ठाकरे सरकार गेले आणि शिंदे सरकार आले. या सगळ्या धामधुमीत 3 जुलै 2022 रोजी या मंदिर समितीचा कार्यकाळ पूर्ण झाला. यानंतर आषाढी यात्रा झाली आणि आता चार महिन्यानंतर येणारी कार्तिकी यात्रा देखील तोंडावर आली आहे. मात्र  अजूनही विठ्ठल मंदिरावर युती सरकारने स्थापन केलेली मंदिर समितीच अस्तित्वात आहे.


 राज्यात सध्या भाजप आणि ठाकरे यांच्यात टोकाचे वितुष्ट येऊनही पंढरपूर मंदिर समितीमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेचा संसार सुखात सुरु आहे . शिंदे फडणवीस सरकारने अजून ही मंदिर समिती कार्यकाळ संपूनही बरखास्त न केल्याने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे , डॉ दिनेश कदम हे दोन सदस्य म्हणून काम पाहत आहेत. भाजपचे सदस्य आणि ठाकरे सेनेचे सदस्य हे मिळालेल्या अघोषित मुदतवाढीमुळे खुश आहेत. नवीन समिती आल्यावर सर्वच सदस्य नवीन असणार असल्याने मिळालेला जास्तीचा काळ आनंदात उपभोगायचे काम भाजप सेनेचे सदस्य करीत आहेत.


 यामुळे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांची चरफड सुरु असली तरी नवीन समिती येईपर्यंत विठ्ठल मंदिरात भाजप आणि ठाकरे सेनेचा संसार गोडीने सुरु आहे. किमान नवीन समिती येईपर्यंत मंदिरावर प्रशासक नियुक्त करावा या मागणीसाठी शिंदे सेना प्रयत्न करू लागली आहे .