Nashik News : नाशिक (Nashik) मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदार (Arrears) यांच्या घरासमोर तसेच आस्थापनांसमोर ढोल वाजवण्याच्या (Dhol Bajao Campaign) मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून या मोहिमेला मनपाच्या (Nashik NMC) सहाय्य विभागात मोठा प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी तब्बल 73 लाख 57 हजार 856 रुपयांची वसुली झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक मनपाच्या थकबाकीदार यांची संख्या वाढली आहे. अनेकदा योजनांचा वापर करून देखील नागरिकांचा प्रतिसाद लाभत नसल्याने नाशिक मनपाने ढोल वाजवण्याची मोहीम सुरू केली आहे. यानुसार घरोघरी जाऊन ज्यांच्याकडे थकबाकी आहे. त्यांच्या घरासमोर ढोल वाजून थकबाकी वसुली केली जात आहे. यानुसार नाशिकच्या पूर्व विभागात सर्वाधिक 28 लाखांची वसुली करण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक पश्चिम विभागात 25 लाख 50 हजारांची वसुली झाली आहे. सर्वात कमी वसुली पंचवटी विभागात तीन लाख 48 हजार 727 रुपये झाले आहे. सहा विभागाचे विभागीय अधिकारी यांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
नाशिक शहरात विविध विकास कामे करताना महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. हा निधी मिळवण्यासाठी विविध कर विभाग नगर रचना विभाग महत्त्वाचे माध्यम आहे विविध कर विभागातील गेल्या वर्षानुवर्ष घरपट्टी तसेच पाणीपट्टीची मोठे प्रमाणात थकबाकी आहे. या संदर्भात थकबाकी तर असलेल्यांना वेळोवेळी महापालिकेकडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे. वेळेवर कर भरा सवलत मिळवा यासाठी मनपाने प्रयत्न केले होते. मात्र प्रयत्न करूनही नाशिक मधील थकबाकीदार प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे नाशिक मनपाने ढोल वाजवण्याला प्राधान्य दिले आहे. आता थकबाकीदारांकडून वसुली करण्यात येत असून या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
नागरिकांनी आपल्याकडे असलेली थकबाकी भरल्यास आम्हाला अशी कारवाई करावी लागणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वसुलीचे प्रमाण कमालीचे घटले होते, आता परिस्थिती रुळावर आली असल्याने नागरिकांनी देखील महापालिकेला सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे यांनी दिली.
विभागनिहाय कर वसुली
नाशिक पूर्व - 28 लाख रुपये
नाशिक पश्चिम - 25 लाख 50 हजार रुपये
पंचवटी - 3 लाख 48 हजार 727 रुपये
नाशिक रोड- 5 लाख 89 हजार 129 रुपये
नवीन नाशिक- 5 लाख 20 हजार रुपये
सातपूर - 5 लाख 50 हजार रुपये