पंढरपूर : विठ्ठल भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदी शुद्धीकरणाचे काम आता सुरु झाले आहे. नमामि चंद्रभागा प्रकल्पाला सुरुवात झालीय. पहिल्या टप्प्यात सात गावात नदीत मिसळणारे सांडपाणी बंद करण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर, गुरसाळे या दोन गावात नमामि चंद्रभागा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी आणि घाण मिसळल्याने चंद्रभागा अर्थात भीमा नदी प्रदूषित झाली. यासाठी चंद्रभागा नदीच्या काठावर 120 गावात स्वच्छ भारत मिशन योजनेतून शोष खड्डे, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन ही कामं हाती घेतली जाणार आहेत.
विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने वारकऱ्याच्या मोठी नाराजी होती. याच घाण पाण्यात स्नान करावे लागते आणि तेच घाण पाणी तोंडात घ्यावे लागत असल्याने विठ्ठल भक्त निराश होत असतो . मात्र प्रशासनाने नमामि चंद्रभागा या शुद्धीकरणाचे काम पुन्हा हाती घेतल्याने लाखो वारकऱ्यांना चंद्रभागेच्या शुद्ध पवित्र पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेता येणार आहे. चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या काठावर साधारण 120 गावे आहेत ज्याचे सांडपाणी नदीत मिसळत असते. या नदीकाठच्या काठावरील गावातील सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी या 120 गावात स्वच्छ भारतमिशन योजनेतून शोष खड्डे , सांड पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन ही कामे हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
चंद्रभागा शुद्धीकरणासाठी त्यांनी चंद्रभागेच्या पायी आणि होडीतून परिक्रमा करून याची पाहणी केली. शासनाच्या सफाई मोहिमेसोबत आता या गावागावात नमामि चंद्रभागा प्रकल्पाबाबत प्रबोधन देखील केले जाणार आहे . राज्यातील आघाडी सरकारने वारकऱ्यांसाठी हे मोठे काम हाती घेतल्याने आता भविष्यात विठ्ठल भक्तांना स्वच्छ आणि शुद्ध चंद्रभागेत पवित्र स्नानाचा आनंद घेता येणार आहे.