Pandharpur Corridor : पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदीचे सर्व घाट, प्रदक्षिणा मार्गाला जोडणारे रस्ते आणि मंदिर परिसरातील प्रस्तावित माउली कॉरिडॉर (Mauli Corridor) मागील काही काळापासून वादाचा मुद्दा बनला आहे. माउली कॉरिडॉर आणि पंढरपूर विकास आराखडा यामुळे व्यापारी आणि नागरिकांची घरे जमीनदोस्त होणार असल्याने या नागरिकांची सध्या जोरदार आंदोलनं सुरु आहेत. पण माउली कॉरिडॉरमुळे दस्तुरखुद्द देवावरची विस्थापित होण्याची वेळ येणार असून मंदिर परिसरातील पुरातन ताकपिठे विठ्ठल मंदिर देखील नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे एका विठ्ठलाची दुसरे विठ्ठल मंदिर पडणार का असा सवाल वारकरी करू लागले आहेत. 


विठ्ठल मंदिराच्या जवळ केवळ 200 फुटांवर ताकपीठे विठ्ठलाचे पुरातन मंदिर आहे. हेमाडपंथी बांधकाम असणाऱ्या या मंदिरात विठ्ठल मंदिर एवढीच आणि तशीच हुबेहूब मूर्ती आहे. या गाभाऱ्यात गेल्यावर आपण कोणत्या विठ्ठलाच्या मंदिरात आलो आहोत असा प्रश्न भाविकाला पडेल असे हे मंदिर आहे. मात्र माउली कॉरिडॉरची रुंदी 120 मीटर करण्याचं प्रस्तावित असल्याने प्रशासनाचा बुल्डोझर या पुरातन ताकपिठे विठ्ठल मंदिरावरून फिरणार या भीतीने भाविक चिंतेत आहेत. विठ्ठल मंदिराप्रमाणे या ताकपिठे विठ्ठल मंदिरातही वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. 13 व्या शतकात अत्यंत गरीब परिस्थिती मधील रमाबाई महाजन या भक्ताच्या हातून ताक आणि पीठ खाण्यासाठी देव तिच्या घरी येतो, म्हणून आज हे  विठुरायाचे ताकपिठे विठ्ठल म्हणून वारकरी संप्रदायात प्रसिद्ध मंदिर आहे.


याच मंदिरावर कॉरिडॉरचा बुल्डोझर येणार असून विठ्ठल भक्तांना सुविधा देण्यासाठी दुसऱ्या विठ्ठल मंदिराला नष्ट करणार का असा सवाल आता या मंदिराचे ट्रस्टी श्री महाजन बडवे यांनी केला आहे. एका बाजूला हिंदुत्ववादी विचाराचे सरकार म्हणायचे आणि विकासाच्या नावाखाली हिंदूंची पुरातन मंदिरे उध्वस्त करायची हे योग्य आहे का असा सवाल महाजन बडवे करतात. हे मंदिर 16 व्या शतकापूर्वीच बांधले गेले असल्याचे दाखले सरकारी दफ्तारात मिळतात. मग विठ्ठल मंदिरात दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी वारकऱ्यांच्याच श्रद्धेचे ठिकाण असलेला ताकपिठे विठोबाचे मंदिर नष्ट करणार का हा प्रश्न असून कॉरिडॉरच्या अवाढव्य रुंदीमुळे मंदिर परिसरातील शेकडो वर्षांपासून चालत आलेली धार्मिक संस्कृती नुसती लोप पावणार नसून दुसऱ्या विठ्ठल मंदिराला यामुळे विस्थापित होण्याची वेळ येणार आहे.