Aurangabad News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन केली जात आहे. तर राज्यपालांना तत्काळ महाराष्ट्रातून परत बोलून घेण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान दुसरीकडे राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आजपासून राजकीय नेत्यांच्या घरासमोर शिवभक्तांकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, मराठा क्रांती मोर्च्याकडून देण्यात आली आहे.
सहकार मंत्री अतुल सावे यांच्या औरंगाबादच्या निवासस्थानापासून या आंदोलनाची आजपासून सुरुवात होणार आहे. 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' मोहीम राबवली जाणार असून, या अंतर्गत सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.
मराठा क्रांती मोर्चाची बैठक...
औरंगाबाद येथे शनिवारी मराठा क्रांती मोर्चा आणि शिवभक्तांची बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अमानकारक वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तर राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' हे साप्ताहिक आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ज्यामध्ये दररोज विविध पक्षांच्या पुढार्यांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवून जाब विचारण्याचा निर्णय झाला.
सावेंपासून आंदोलनाची सुरवात...
ढोल बजाव आंदोलनाची सुरुवात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर सर्व शिवभक्त ढोल वाजवून करण्यात येणार आहे.यावेळी मंत्री सावे यांना जाब विचारणार आहेत की, राज्यपालाने शिवरायांचा केलेल्या अवमानाची माहिती आपणास आहे का ?असल्यास आपण राज्यपाल हटावची मागणी केली आहे का ? असे प्रश्न विचारले जाणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे. आज सकाळी हे आंदोलन केले जाणार आहे.
राज्यपालांच्या विरोधात राज्यभरात संताप...
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. 'छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असून, नितीन गडकरी सध्याचे आदर्श असल्याचं, राज्यपाल म्हणाले होते. त्यांच्या याच विधानामुळे राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शिवभक्तांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहे. तर अजूनही आंदोलन सुरूच आहे. राज्यपाल यांनी तात्काळ माफी मागून त्यांची महाराष्ट्रातून उचल बांगडी करण्याची मागणी देखील केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: