Pandharpur: परतीच्या पावसाने यंदा सर्वात मोठा दणका बळीराजाला दिला असून सर्वच प्रकारच्या पिकाला याचा फटका बसला आहे. अजूनही परतीचा पाऊस निरोप घेण्यास तयार नसल्याने गाळप हंगामाचा शुभारंभ करूनही साखर कारखाने बंदच असल्याचे चित्र पहिल्यांदाच समोर आले आहे. खरंतर आजपासून या वर्षीचा हंगाम सुरु होणे अपेक्षित होते, राज्यभरातील जवळपास 210 कारखान्याची धुराडी देखील पेटली. ऊस तोडीच्या टोळ्या गावोगावी दाखल झाल्या. मात्र उसाच्या फडातील पाणीच कमी न होऊ शकल्याने अजून उसाला कोयतंच लावता आलेला नाही. ऊस तोडणीचे सुरु न झाल्याने कारखान्याच्या गाळपाचे शुभारंभ होऊनही राज्यातील कारखाने उसाअभावी बंद असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याचा थेट फटका साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.
14 कोटी 13 लाख मेट्रिक टन एवढा ऊस गाळपासाठी
यंदा सर्वत्र चांगला पाऊसकाळ झाल्याने राज्यात पहिल्यांदाच विक्रमी 14 कोटी 13 लाख मेट्रिक टन एवढा ऊस गाळपासाठी असल्याने 15 ऑक्टोबर म्हणजे आजपासून गाळप हंगामास सुरुवात झाली आहे. राज्यभरातील कारखाना कार्यक्षेत्रावर शेकडो टोळ्या आठ दिवसापूर्वीच दाखल देखील झाल्या, मात्र अजूनही पावसाची धुमशान सुरु असल्याने उसाच्या फडात सर्वत्र पाणीच पाणी असल्याने ऊस तोडायचा कसा हा प्रश्न तोडणी कामगारांच्या समोर उभा राहिला आहे. यातच उसात पाणी असल्याने या टोळ्यांना शेतकऱ्याच्या फडात जात येत नसल्याने मिळेल तिथे आसरा घेऊन या टोळ्या पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. आमच्या हाताला कामही नाही आणि सोबत आणलेले धान्य देखील संपू लागल्याने या तोडणी मजूर कुटुंबाची चिंता देखील वाढू लागली आहे.
पाण्यातील उसाची तोडणी कशी करायची?
दुसऱ्या बाजूला शेतात गाळपासाठी उभा ऊस आहे. तोडणीला टोळ्या आल्या आहेत मात्र पाण्यातील उसाची तोडणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. यामुळे उसाचा उतारा घटून याचा फटका पुन्हा आम्हा शेतकऱ्यालाच बसेल असे ऊस उत्पादक शेतकरी माऊली सलगर यांना वाटते. शेतात कमरेएवढे पाणी असल्याने हे मजूर ऊस तोडणार कसा आणि चिखलातून बाहेर आणणार कसा हा प्रश्न असल्याचे ते सांगतात.
साखर कारखानदारांवर सध्या कारखाने बंदच ठेवायची वेळ
गाळपाचे शुभारंभ करून देखील ऊस मिळत नसल्याने सध्या कारखाने बंदच ठेवायची वेळ साखर कारखानदारांवर आली आहे. यामुळे कारखाना कामगारांना बसून पगार द्यावा लागतोय. कारखाना सुरु राहिल्याने रोजचा खर्च वाढतोय आणि आता ऊसतोडणी मजुरांना देखील काहीतरी द्यावे लागणार असल्याने कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढत आहेत. त्यातच यंदा 50 टक्के पेक्षा जास्त खोडवा ऊस आहे त्यामुळे रिकव्हरी कमी येणार याची जाणीव आहे. त्यातच सध्या उस पाण्यात असल्याने रिकव्हरी मोठ्या प्रमाणात घटणार आहे. त्यामुळे यंदा ऊस मुबलक असला तरी उतारा घातल्याचा फटका कारखानदार आणि शेतकरी या दोघांना बसणार आहे . सध्याचे पावसाचे चित्र पाहता यंदाचा गाळप हंगाम किमान महिनाभर पुढे जाण्याची शक्यता आहे . आता हंगाम लांबल्यास पुन्हा ऊसतोड टोळ्यांचा आणि उसाच्या रिकव्हरीची डोकेदुखी शेतकऱ्यांना सहन करावी लागणार आहे.