पंढरपूर: पंढरपुरात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत.

शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचं यावेळी जाधव दाम्पत्यानं सांगितलं.

महापूजेवेळी जलसंपदामंत्री गिरिश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह शिवसेनेचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

दरम्यान, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली होती. या दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरश: उजळून निघाला होता.

मुख्यमंत्र्या ‘वर्षावर सपत्नीक पूजा

पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा सुरु असतानाच इकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात जाण्याचं टाळलं. विठ्ठलाच्या कृपेनंच आपण हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याचं ट्विटही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.



मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना विरोध

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या आंदोलकांनी गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा परिसरात ठिय्या दिला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा करु न देण्याचा निर्णय मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही शासकीय पूजा न करण्याचा निर्णय घेतला.

मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता. ''मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकतं. काही संघटनांना हे माहित असूनही मराठा समाजाला उचकवण्याचं काम केलं जात आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

माझ्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे,'' असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. ''महाराष्ट्रात वारीची परंपरा 800 वर्षांपासून आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याला सरंक्षण दिलं. मुख्यमंत्र्यांनी पूजा करावी ही परंपरा आहे. मी तीन वर्षांपासून जातो. मात्र काही संघटनांनी याला विरोध केला. ही भूमिका चुकीची आहे, असं मुख्यमंत्र्यांनी  नमूद केलं.

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. संरक्षणात ती केली जाऊ शकते. पण वारकऱ्यांच्या जीवाला धोका होईल म्हणून मी न जाण्याचा निर्णय घेतलाय,'' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आषाढी पूजा आणि आंदोलनाचा इतिहास

आषाढी यात्रा काळात आंदोलनाची ही पहिलीच वेळ नाही. या काळात नेहमीच आंदोलक सक्रिय असतात. कारण, या आंदोलनातून राज्याचं लक्ष वेधलं जातं. ही गेल्या अनेक वर्षांपासूनची ही प्रथा आहे. आषाढी यात्रेच्या काळात विविध संघटना आंदोलन करतात. ज्यामुळे यापूर्वीही अनेक नेत्यांना याचा फटका बसला आहे.

राज्यात 1996 साली युतीचं सरकार असताना मनोहर जोशी यांना आषाढीची पूजा रद्द करावी लागली होती. मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार झाला होता. तेव्हा दलित संघटनांनी मनोहर मोठ्या आंदोलनाची तयारी केली मनोहर जोशींना पूजा न करु देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे यात्रेला गालबोट लागू नये म्हणून मनोहर जोशी यांनी स्वतःच पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राज्याच्या मुख्य सचिवांनी पूजा केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना कार्तिकीची पूजा रद्द करावी लागली होती. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ बंडा तात्या कराडकर यांच्या आंदोलननानंतर आर. आर. पाटलांनी पूजेला जाणं रद्द केलं. तेव्हाच्या वारकरी प्रश्नावर आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळात धरणासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तेव्हा सर्वांनी त्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकीच्या पूजेला विरोध केला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या हस्ते होणारी पूजा रद्द करण्यात आली आणि जिल्ह्यातले नेते दिलीप सोपल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही बंडा तात्या कराडकर यांनी अडवलं होतं. पंढरपुरातल्या शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला आणि आश्वासन घेतलं होतं. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पूजा केली.

दरम्यान, 25 वर्षांपूर्वी गजानन महाराज संस्थानचा हत्ती उधळला अशी अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी झाली होती. या अफवेने झालेल्या चेंगराचेंगरीत दहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे प्रत्येकानेच कोणतीही संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल, असं कृत्य न करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या :

आषाढी वारी सुरळीत पार पडू द्यावी, उदयनराजेंचं आवाहन

जेव्हा मनोहर जोशी, अजित पवार यांना विठ्ठलाच्या पूजेपासून रोखलं होतं...

मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा न करु देण्यावर मोर्चेकरी ठाम