पंढरपूर : सिंहगड संस्थेनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सोलर कार स्पर्धेत 14 संघ सामील झाले होते. विशेष म्हणजे आफ्रिका खंडातील रवांडा देशातील टीमचाही या स्पर्धेत सहभाग होता.


या स्पर्धेसाठी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सोलर कार दाखल झाल्या होत्या. विविध देशातून 41 संघांनी यासाठी नोंदणी केली होती, मात्र या कालावधीत केवळ 14 संघांच्या कार पात्र होऊन दाखल झाल्या. यामध्ये आफ्रिकन देशातील रवांडा येथील एकच परदेशी संघ आपली गाडी घेऊन आला असला, तरी चेन्नईप्रमाणेच देशातील इतर भागातून संघ दाखल झाले होते.

या स्पर्धासाठी सोलर कारची तांत्रिक तपासणी, वेग व नियंत्रण यासोबत सोलर राऊण्ड अशा तीन स्पर्धा पहिल्या दिवशी घेण्यात आल्या. यातील शेवटच्या सोलर राऊण्ड मध्ये आखून दिलेल्या वळणावळणाच्या मार्गावरुन ही कार चालवताना स्पर्धकांना बरीच कसरत करावी लागत होती.

या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या कार या 160 ते 390 किलो वजनाच्या होत्या. यात 300 ते 510 वॉट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. प्रत्येक कार बनवताना या विद्यार्थ्यांनी तिचे वजन मर्यादित ठेवत विविध प्रयोग केले आहेत.

चेन्नईच्या हिंदुस्थान युनिव्हर्सिटीच्या टीमने आपल्या सोलर कारला सैनिकी गाडीचे स्वरुप देत सुरक्षेची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. चेन्नई मधून दोन युनिव्हर्सिटीमधील टीम सहभागी झाल्या.

रवांडा येथून आलेल्या आफ्रिकन मुलामुलींनी आपली गाडी येथील सिंहगड संस्थेतच बनवून स्पर्धेत उतरवली. जगभरात सोलर ऊर्जेबाबतची जाणीव वाढत असल्यानेच रवांडा येथून दहा इंजिनियरिंगचे विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेसाठी पंढरपूरमध्ये आले.

या कार बनवताना पुण्यातील सिंहगडच्या टीमने गाडीत मागच्या चाकावर नियंत्रणासाठी असलेल्या डिफरेन्शियलऐवजी इलेक्ट्रॉनिक सर्किट बसवून त्यावर चांगल्या पद्धतीने मागच्या चाकावर नियंत्रण मिळवलं. हे तंत्रज्ञान सध्या बाजारात असलेल्या वाहनातही वापरणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे खर्च कमी होऊन चांगल्या पद्धतीने मागच्या चाकांवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचं
सौरभ जाधव आणि श्रीकर संगम या टीम मेंबरनी 'माझा'शी बोलताना सांगितलं. अशा पद्धतीने बनवलेली ही भारतातील एकमेव कार असल्याचा दावा विद्यार्थ्यानी केला.

इंडोरन्स फेरीत सलग तीन तास या गाड्या चालवाव्या लागतात. ही सर्वात अवघड फेरी मानली जात असून यात विद्यार्थ्यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. सौरऊर्जेच्या जास्तीत जास्त वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पंढरपूर येथील सिहंगड टेक्निकल इन्स्टिटयूटने आंतरराष्ट्रीय सोलर कार स्पर्धा आयोजित केली होती. एकीकडे पारंपरिक ऊर्जेचा भरमसाठ वापर होऊ लागला असताना निसर्गाने दिलेल्या अपारंपरिक स्रोतांचा वापर वाढवून प्रदूषणमुक्त समाज निर्मितीसाठी अशा स्पर्धातून प्रेरणा मिळावी या हेतूतून या स्पर्धांचे आयोजन
करण्यात आलं होतं.

गेल्या चार वर्षांपासून सिंहगडमध्ये या स्पर्धा घेतल्या जात असून यातून इंजिनियरिंगच्या मुलांना नवनवीन प्रोजेक्ट सादर करुन त्यांच्या प्रयोगशीलतेची विकास साधण्याचा प्रयत्न संस्था करत असल्याचं प्राचार्य कैलास करांडे यांनी सांगितलं. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसोबत या कॉलेजच्या मुलांनी तयार केलेल्या विविध 332 प्रयोगांचं सादरीकारण आणि प्रदर्शनही भरवण्यात आलं.