पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजणीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे. 


पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : भाजपचे समाधान आवताडे विजयी; भगीरथ भालकेंच्या पराभवाची कारणे?


भाजप आणि राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीनेही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील असे सर्वच मोठे नेते येथे प्रचाराला उतरले होते. त्याचाच फायदा इथे समाधान आवताडेंना झाला. राष्ट्रवादीकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतले अनेक नेते येथे तळ ठोकून होते. मात्र राष्ट्रवादीच्या या प्रचाराचं यशात रुपांतर झालं नाही. 


Pandharpur By-election : तुम्ही इथला विजयी कार्यक्रम करा मी राज्यातल्या सरकारचा पुरता कार्यक्रम करतो :देवेंद्र फडणवीस


या निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'करेक्ट कार्यक्रमा'ची भाषा केली होती. या विजयानंतर या  'करेक्ट कार्यक्रमा'ची देखील चांगलीच चर्चा सुरु आहे. 'समाधान आवताडे यांना  विजयी करून इथला कार्यक्रम करा, मी सरकारचा संपूर्ण 'करेक्ट कार्यक्रम' करतो असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या वक्तव्यानंतर पुन्हा सत्ताबदलाच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र 105 आमदारांमध्ये समाधान आवताडे यांची एकाची भर पडल्यानंतर हा  'करेक्ट कार्यक्रम' फडणवीस कसे करणार? असा सवाल केला जातोय. मात्र आवताडे यांच्या विजयानंतर फडणवीसांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आज पुन्हा फडणवीस यांनी योग्यवेळी सरकारचा कार्यक्रम करायचा आहे. पण आता लक्ष कोरोनावर आहे, असं म्हणत भाष्य केलं.   


करेक्ट कार्यक्रमावर संजय राऊत म्हणाले
पंढरपूर निकालाबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, स्थानिक राजकीय समीकरणानं हा पराभव झालाय. जो महाविकास आघाडीसाठी धक्का आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम सुरू करावा आमचाही कार्यक्रम ठरलेला आहे. दोन कार्यक्रम होतील. पंढरपूरच्या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलेला नाही, असं ते म्हणाले. 


करेक्ट कार्यक्रमावर पडळकरांची पोस्ट 
या निवडणुकीत जोरात प्रचार केलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ असा सवाल केला. देवेंद्र फडवणीस यांनी या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करतो असे बोलले होते. त्यानुसार  पंढरपूर-मंगळवेढा म्हधील जनतेने हा कार्यक्रम केलाय. आता पुढचे फडणवीस ठरवतील, असेही पडळकर म्हणालेत.