पंढरपूर : कोरोनाच्या लाटेत झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाच्या कलात 35 व्या फेरीपर्यंत भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर आहेत. तीन फेऱ्यांची मतमोजणी बाकी असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत विजयोत्सव सुरु केला आहे. विजयाच्या उंबरठ्यावर असलेले समाधान आवताडे यांनी याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आवताडे म्हणाले की, आमचा विजय निश्चित होईल. विजयाची घोषणा होणं बाकी आहे. पांडुरंग परिवार आणि सर्व पंढरपूर-मंगळवेढ्यातील जनतेची ताकत मिळाली. लोकं पाठिशी उभे राहिले. हा विजय जनतेचा आहे. सरकारच्या विरोधात जनतेनं दिलेला कौल आहे. विजयाची घोषणा झाल्यावर आपण सविस्तर आहे. गुलाल तर उधळलाच आहे. औपचारिक घोषणा होणे आवश्यक आहे. प्रचारादरम्यान विरोधकांनी आमच्यावर टीका केल्या मात्र या टीकेला जनतेनं मताच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे, असं समाधान आवताडे म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत पारिचारक म्हणाले की, आम्ही सगळ्यांनी सोबत काम केलं. मतविभागणी टाळण्यावर आम्ही भर दिला. एखाद्याला जर आपण वचन दिलं तर ते पाळायचं हे आमचं तत्व आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम मानून आम्ही काम केलं. आम्ही जो जनतेला विश्वास दिला होता विकासाचा त्यावर जनतेनं विश्वास दाखवला आहे. हे यश आमच्या कार्यकर्त्यांचं आहे, असं आमदार प्रशांत पारिचारक म्हणाले.