मुंबई : पश्चिम बंगालच्या मतमोजणीच्या कलांवरून त्या राज्यात ममता बॅनर्जींची लाट कायम असल्याचं स्पष्ट झालंय. तृणमूलने दोनशेंच्या वर जागांवर आघाडी घेतली असून बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता राज येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 150 च्या वर जागा जिंकू असा दावा करणाऱ्या भाजपला त्याच्या अर्ध्या जागांवर आघाडी मिळाली आहे. देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अनेक बड्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जास्त रस असल्याचं दिसून आलं.
ममता दिदींच्या या विजयावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये कृत्रिम वादळ तयार केलं गेलं. सरकारी यंत्रणेचा वापर केला. महामारीचं संकंट असताना देखील या सगळ्या पोकळ वातावरणात वाघिण जखमी झालेली विजयी झालेली आहे. एक जखमी शेरणी, जिच्यावर सर्वांचा दबाव होता, केंद्रीय यंत्रणांचा मोठा दबाव होता . तरीही हि शेरणी हरली नाही ती जिंकली, देशासाठी हि सकारात्मक बाब आहे, असं राऊत म्हणाले.
ते म्हणाले की, भाजपचे सर्व नेते कामाला लागले होते पण दीदी भारी पडली. जनतेनं ममता बॅनर्जीला लोकांनी जिंकून दिलं आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, आणि नड्डाजी ज्याप्रकारे मैदानात उतरले होते. तेव्हा कोरोनाचा विसर पडला होता. पण मद्रास हायकोर्टनं चपराक लावली होती. ममता बॅनर्जी यांनी दादागिरी चालणार नाही हे दाखवून दिलं आहे, असं राऊत म्हणाले.
पंढरपूर निकालाबाबत बोलताना ते म्हणाले की, स्थानिक राजकीय समीकरणानं हा पराभव झालाय. जो महाविकास आघाडीसाठी धक्का आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम सुरू करावा आमचाही कार्यक्रम ठरलेला आहे. दोन कार्यक्रम होतील. पंढरपूरच्या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलेला नाही, असं ते म्हणाले.