मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व स्तरांतून त्यांना वंदन केले आहे. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं त्याला पराभूत करता येतं हे महाराजांनी वारंवार सिद्ध केलं. महाराजांचे हे कर्तृत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान, राष्ट्राभिमान शिकवला. संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. आज तीनशे वर्षांनंतरही महाराजांचं कार्य, त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देत आहेत.
किल्ल्यांची पडझड, शिवप्रेमी म्हणतात, शिवरायांच्या या खऱ्या स्मारकांचे जतन व्हावं
छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं. त्यांनी निर्माण केलेले अनेक किल्ले आज आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. मात्र ऐतिहासिक अशा अनेक किल्ल्यांची, त्याच्या काही बुरुजांची पडझड झाल्याचं पहायला मिळतंय. शिवरायांच्या या खऱ्या स्मारकांचे जतन करणे आणि त्यांचे पावित्र राखणे आवश्यक आहे, अशी शिवप्रेमींची मागणी आहे.