पंढरपूर : लाखो विठ्ठल भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर शहरातून आषाढी यात्रेच्या काळात सात दिवस मद्य, मांस विक्री बंद करण्याची मागणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रशासनाने घेतलेल्या आषाढी यात्रा आढावा बैठकीत करण्यात आली. यावेळी मद्य, मांस विक्रीच्या विरोधात वारकरी संप्रदाय पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज आषाढी यात्रेसाठी तयारीची आढावा बैठक घेण्यात आली.

पंढरपूर शहरातील मद्य मांस विक्री कायमची बंद करावी या मागणीसाठी गेली 35 वर्षे वारकरी संप्रदाय ठाम असून अनेकवेळा यासाठी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. आजच्या बैठकीत आषाढी यात्राकाळात आषाढ शुद्ध दशमी ते आषाढ शुद्ध पौर्णिमा हे सात दिवस शहरातील मद्य मास विक्री बंद करण्याची मागणी शासनाकडे केली.

दरवर्षी शासन दशमी ते द्वादशी अशी तीन दिवसांची मद्य मास विक्री बंदी करीत असते. पण यंदा वारकरी संप्रदाय ही बंदी पौर्णिमेपर्यंत वाढवण्यासाठी आक्रमक झाला आहे . आषाढी काळात शहरामध्ये 12 ते 15 लाख वारकरी जमा होत असतात. अशावेळी शहरातील मद्य आणि मांस विक्रीच्या ओंगळवाण्या स्वरूपाला भाविकांना सामोरे जावे लागते.

यावरूनच वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून शासनाला महसूल मिळवायला अनेक ठिकाणे असताना वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावून मद्य मांस विक्रीचा पैसा कशाला हवाय असा सवाल वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी केला आहे.

दरम्यान शहरातील सुरु असलेली सर्व विकासकामे 30 जून पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला दिले आहेत. आषाढी यात्रेच्या काळात सहा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन केले असून यात्रा सुरळीत पार पाडण्याचे नियोजन पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यंदाची यात्रा निर्मल वारी करण्यासाठी शासनाने जय्यत तयारी केली असून यंदा दोन्ही मुख्य पालखी सोहळ्यात 1700 हून अधिक ई टॉयलेट बसविले जाणार असल्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिती असली तरी कुठेही पाणीटंचाई जाणवू नये यासाठी पाण्याच्या जादा टँकरची व्यवस्था केल्याचेही देशमुख यांनी सांगितले.