जगतगुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातील यवतहून वरवंडच्या दिशेने निघाली असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी येथील अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली.
वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी कुणी अन्नदान करतंय तर कुणी अंथरूण-पांघरुन देतेय. मात्र पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या कला केंद्रातील नर्तिकांनी आपल्या कलेचे सादरीकरण वारकऱ्यांसमोर करून आपलीही सेवा विठल चरणी पोहचविण्याचा सायास केला.
यावेळी या नर्तिकांनी विठुरायाच्या भक्ती गीतांवर टाळ धरला सोबतच लावणीही सादर करत जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर केला. या जुगलबंदीमुळे या वारकऱ्यांचा थकवाच दूर झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून या कलाकेंद्राच्या नर्तिका वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात ही परंपरा त्यांनी आजही कायम जपली आहे. या लावणी कलाकारांकडून आज जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना जेवण देण्यात आले सोबतच आपली कलाही सादर केली.
दरम्यान, दुसरीकडे सासवडहून सकाळी निघालेल्या माऊलीची पालखीने आज जेजुरीसाठी प्रस्थान केले. आज जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णव भक्तांचा मिलाप झाला. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत 17 मुक्काम करून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस पर्वणी असतो. माऊलींची पालखी बरोबर जेजुरी गडावरच्या मंदिरासमोर आल्यानंतर पालखीवर भंडारा उधळला गेला आणि माऊलींना पिवळं केलं गेलं. हाच क्षण अनुभवण्यासाठी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी यावेळी जेजुरी पंचक्रोशीतील गावकरी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.