Ashadhi Wari 2022 : गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे आषाढी यात्रेला पालखी सोहळे येऊ शकले नव्हते. मात्र यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्यावर पुन्हा एकदा वारकऱ्यांना पालखी सोहळ्यासोबत पंढरीची वाट चालायचे वेध लागले आहेत. पालखी सोहळ्यातील मानाच्या पालखी सोहळ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थानाचा कार्यक्रम देखील जाहीर केल्यानंतर शासन आणि प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. असे असले तरी वारकऱ्यांसाठी हाती घेतलेल्या विकास प्रकल्पांची अडचण काही ठिकाणी पालखी सोहळ्याला अडसर ठरणार असल्याने यातून सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी शासन आणि प्रशासनाची धडपड सुरु आहे.


केंद्र सरकारने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाची कामे जवळपास पूर्णत्वाकडे जात असताना पालखी सोहळ्यातील काही महत्वाची ठिकाणी उड्डाण पूल आणि रस्त्यात गेल्याने यातून तोडगा कसा काढायचा हा प्रश्न प्रशासन समोर आहे.


विसावा रथात बसून घ्यावा लागणार


संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे 4 पदरी रुंदीकरण करताना माळशिरस तालुक्यातील पुरंदवडे येथील माऊलीच्या विसाव्याच्या कट्टा मार्गात गेल्याने आता यंदा हा विसावा रथात बसून घ्यावा लागणार आहे. यानंतर माळशिरस आणि पंढरपूर तालुक्याच्या वेशीवर संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या बंधू भेटीचा सोहळा एका ठिकाणी होत असतो. मात्र येथे उड्डाणपूल झाल्याने आता या सोहळ्याची पारंपारिक जागा देखील बदलावी लागणार आहे.


मुक्कामाच्या जागा रस्त्यात गेल्याने पर्यायी जागेची व्यवस्था करावी लागणार
पंढरपूर जवळ आल्यावर भंडीशेगाव या ठिकाणी पालखी तळातील संत सोपानदेव आणि संत चांगा वटेश्वर यांच्या मुक्कामाच्या जागा रस्त्यात गेल्याने आता या दोन मानाच्या पालखी सोहळ्याला पर्यायी जागेची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या प्रशासन यासाठी जागा शोधण्याच्या प्रयत्नात आहे.  मात्र पारंपारिक जागेच्या ऐवजी दुसऱ्या जागेवर जाण्याबाबत या दोन्ही पालखी सोहळ्याची समजूत काढावी लागणार आहे . 


सर्वात जटील प्रश्न पंढरपूर शहरात प्रवेश करताना


सर्वात जटील प्रश्न पंढरपूर शहरात प्रवेश करतानाच उभा राहिला असून या सर्व पालख्यांचे रथ हे धातूचे असून ते रेल्वे क्रॉसिंग वरून शहरात प्रवेश करीत असतात. मात्र सध्या रेल्वेचे विद्युतीकरणाच्या कामामुळे या रेल्वे रुळावर हाय टेन्शन वायर जात असल्याने पालख्यांच्या रथाला धोका निर्माण होऊ शकणार आहे. यासाठी एकतर सर्वच पालखी सोहळ्यांनी आपल्या पादुका पालखीत घालून खांद्यावरून मठापर्यंत न्याव्या लागणार आहेत. अन्यथा रेल्वेच्या या हाय व्होल्टेज ओव्हरहेड तारेतील प्रवाह पालख्या येण्याच्या वेळेला बंद करावा लागणार आहे. यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे रेल्वे प्रशासनाच्या संपर्कात असून जर यात काही अडचणी आल्या तर मात्र पालखी सोहळे शहरात कसे न्यायाचे हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. वारकरी संप्रदाय कायमच आपल्या रूढी परंपरा जपण्यासाठी कोणत्याही टोकाच्या संघर्षाला तयार असतो. मात्र शासनाने वारकऱ्यांसाठीच राबविलेल्या या विकास प्रकल्पाचा फायदा जसा संप्रदायाला होणार आहे तशा थोड्या अडचणी देखील संप्रदायाने सहन केल्या तर प्रशासन आणि संप्रदाय यातील संघर्ष टळणार आहे.