Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात सध्या बांधकाम विभागाचा अजब कारभार सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण न करताच मोजमाप पुस्तिका तयार करण्यात आल्या तर काही ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. या बाबत नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र त्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आली. 


महागाव तालुक्यातील कवठा ते हिवरदरी या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून पुसदच्या गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. हे काम पूर्ण न करताच मोजमाप पुस्तिका तयार करून 26 लाख 22 हजार रुपयाचे बिल सादर केले. मात्र कार्यकारी अभियंताला संशय आल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट दिली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.


वास्तविक पाहता गेल्या कित्येक दिवसापासून हे काम प्रलंबित होते. त्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. आता काम पूर्ण होणार म्हणून गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, काम झालेच नाही उलट काम पूर्ण झाल्याचं भासवून बिल दाखल करण्यात आले. 


महागाव तालुक्यात झालेल्या रस्त्याच्या कामात मोठा घोळ आहे. लेवा ते बारभाई तांडा हा रस्ता 8 महिन्या पूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आला. मात्र, हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. काही ठिकाणी रस्ता हाताने उखरल्या जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्त्या जैसे थे होण्याची भीती आहे. या रस्त्या बाबत ही गावातील एका सुज्ञ तरुणाने बांधकाम विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. या रस्त्याचे कंत्राट पुसदच्या बी के कन्स्ट्रक्शनला दिले गेले होते. 127.32 लाख रुपये खर्च करून केलेला हा रस्ता किती दिवस टिकेल हे कोणालाही सांगता येणार नाही. 


रस्त्याच्या या प्रकरणात आमदार नामदेव ससाणे यांनीही उडी घेतली.अधिकरी आणि कंत्राटदार यांच्या संगन मताने हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी  केला आहे.  कवठा रस्त्याचे काम पूर्ण न करताच मोजमाप पुस्तिका तयार करून बिल हडप करण्याचा प्रयत्न झाला. मात्र खरी स्थिती अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने वेळीच सर्व प्रकार बाहेर आला आहे. हे सगळं नियमबाह्य पद्धतीने केल्यानंतरही गजानन कन्स्ट्रक्शनकडून मात्र नियमाप्रमाणे काम करत असल्याचं सांगितलं जातं आहे.


कवठा रस्त्याचे काम पूर्ण न करताच मोजमाप पुस्तिका तयार करून बिल काढण्याचा प्रयत्न झाला.  मात्र कार्यकारी अभियंत्यांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे. 


ग्रामीण भागातील नागरिक शहरी भागाशी जोडली जावी, या उद्देशाने सरकारकडून रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात मात्र मध्येच कुठे तरी पाणी मुरले जात आहे. आता या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई होणे अपेक्षित असल्याची  मागणी होत आहे