पंढरपूर : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून निसर्गरम्य विष्णुपदावर पिकनिकला गेलेले विठुराया बुधवारी (13 जानेवारी) रात्री विठ्ठल मंदिरात परतले. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक रथामधून होणार देवाचा प्रवास यंदा कोरोनामुळे चक्क मंदिर समितीच्या स्कॉर्पिओ गाडीतून झाला.

Continues below advertisement


मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी देवाचे विष्णुपदावर सालंकृत पूजा संपन्न झाल्यावर पादुका विधीवतपणे विष्णुपदावरुन वर आणण्यात आल्या. इथे मंदिर समितीच्या वतीने सजवलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून देवाचा प्रवास गोपाळपूर येथून विठ्ठल मंदिराकडे सुरु झाला.


वाटेत ठिकठिकाणी भाविक देवाच्या दर्शनासाठी उभे होते. यानंतर नामदेव पायरी येथे विठुरायाचे मंदिरात आगमन झाल्यावर मंदिराबाहेर जमलेल्या भाविकांनी देवाच्या पादुकांचे दर्शन घेतल्यावर देवाला मंदिरात नेण्यात आले. इथे विठ्ठल मूर्तीजवळ या पादुका नेण्यात येऊन देवाला पुन्हा विटेवर पोहोचवण्यात आले.


देवाच्या पिकनिकची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. गुराख्यांसोबत गोपाळकाला केलेले ठिकाणी म्हणून ओळख असलेल्या विष्णुपदावर देवाचा महिनाभर मुक्काम असतो. यंदा कोरोनामुळे मात्र रथऐवजी देवाला स्कॉर्पिओमधून प्रवास करत मंदिरात पोहोचावे लागले.


मकरसंक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिर फुलांनी सजलं
आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आज पुण्यातील भाविक नवनाथ भिसे यांच्याकडून विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. झेंडू, अष्टर, शेवंती, कार्नेशन, ऑर्किड, बिजली, ग्लॅडिओ अशा विविध प्रकारच्या फुलांनी विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संक्रांतीला राज्यभरातील महिला भाविक देवीला ओवसायाला येत असतात. यंदा कोरोनामुळे ओवसायाला परवानगी नसली तरी या सुंदर फुल सजावटीने प्रत्येक भाविकांचे मन मोहून जात आहे.