वर्धा : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीत प्रकरणात पीडितेच्या आई-वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी पीडितेच्या आईला अश्रू अनावर झाले. त्यांना अस्वस्थ वाटल्याने न्यायालयाचं कामकाज दहा ते पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं, अशी माहिती वकिलांनी दिली.


हिंगणघाट येथे प्राध्यापिका कॉलेजला जात होती. आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळेने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळलं. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे. हिंगणघाट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात काही साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले. न्यायालयात पीडित प्राध्यापिकेचे वडील आणि आईची बुधवारी (13 जानेवारी) साक्ष नोंदवण्यात आली.


घटनेच्या आधीपासून आरोपी हा मुलीचा पाठलाग करत होता. लग्न केलं नाही तर खून करेन, अशी धमकी त्याने दिली होती, ही बाब न्यायालयात सांगताना पीडित प्राध्यापिकेच्या आईला अश्रू अनावर झाले. त्या अस्वस्थ होत्या. त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटं न्यायालयाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. त्यांची उलटतपासणी झाली. पुढे 15, 16 आणि 17 फेब्रुवारी अशी सलग तारीख ठेवण्यात आली. आतापर्यंत सरकारी पक्षातर्फे आठ साक्षदारांची साक्ष पूर्ण झाली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.


सोबतच मृत प्राध्यापिकेच्या वडिलांचीही उलट तपासणी पूर्ण करण्यात आली. उर्वरित साक्षीदारांची उलट तपासणी पुढील तारखांना घेतली जाईल.


बचाव पक्षातर्फे अॅड भूपेंद्र सोने यांनी बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले की, "मीही माणूस आहे. मला मृत तरुणीच्या आई-वडिलांना प्रश्न विचारताना त्रास झाला. तिचे आई-वडील कोर्टात आल्यानंतर मी त्यांची माफी मागितली. मी बचावपक्षाचा वकील असून उलट तपासणी घेणं भाग आहे." त्यांनी माफी दिल्यानंतरच उलट तपासणी घेतल्याचं अॅड भूपेंद्र सोने यांनी सांगितलं.