Ashadhi Wari : षाढी यात्रेसाठीआजपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आषाढीसाठी काही मानाच्या पालख्यांचं पंढरीकडे प्रस्थान झालं आहे तर काही वेळात उर्वरित पालख्याही पंढरीच्या दिशेनं रवाना होतील. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षांपासून एसटी बसनं या मानाच्या पालख्या पंढरपूरला येत आहेत.  गेल्या वर्षभरापासून राज्यभरात कोरोनाचं सावट पसरल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी राज्य सरकारने पंढरपूरकडे जाणाऱ्या वाऱ्या आणि पालख्या यांच्यावर निर्बंध लावले आहेत. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, मात्र मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.


Ashadhi Wari :  तयारी आषाढीची! पंढरपूरसह 10 गावात संचारबंदी, महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसह 50 लोकांनाच परवानगी


संत मुक्ताई पालखीचा पहिला मान 
पंढरीच्या वारीसाठी जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो.  जळगाव जिल्ह्यातील या मानाच्या पालखीचं आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने पहाटेच्या वेळी प्रस्थान झालं.  जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचं राज्याच्या अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात मोठं मानाचं स्थान आहे. राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध पालख्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील ही पालखी सर्वात आधी निघत असते. तशी ती पंढरपूर येथेही संत मुक्ताई पालखीचं पहिल्यांदा आगमन होत असतं. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी येथून संत मुक्ताई समाधी मंदिरापासून दर वर्षी आषाढी पंचमीला या वारीचं प्रस्थान होत असतं. यामध्ये शेकडो दिंड्या आणि पालख्या हजारो वारकऱ्यांच्या सहभागी असतो. मात्र यंदा केवळ 40 वारकऱ्यांसह ही पालखी एसटीने रवाना झाली आहे. 


Ashadhi Wari : आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई, पाहा नेत्रदीपक फोटो


संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. सजविलेल्या दोन शिवशाही बस मधून 40 वारकरी ग्यानबा तुकारामच्या जयघोषात मार्गस्थ झाले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार टाळकरी मानकरी यांची निवड करण्यात आलीय सोबत वैद्यकीय पथकही आहे. पायी वारी दरम्यान ज्या नित्य पूजा आरती होतात त्या बसमध्येच होणार असून त्रंबकेश्वरहुन निघालेली पालखी कुठेही न थांबता दुपारी 3 वाजेपर्यंत वाखरीला पोहोचणार आहे.  भागवत धर्माची पताका ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने पहाटे 5 वाजता संजीवनी समाधी मंदिरातून प्रस्थान ठेवले. सुरवातीला कुशावर्त तीर्थात माऊलींना मंगल स्नान आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर परंपरेप्रमाणे  त्रंबकेश्वरच्या मंदिरापर्यंत पालखी मार्गस्थ झाली, पालखीच्या स्वागताला वरुणराजानेही हजेरी लावली.  पंढरपूरच्या पायी वारीला परवानगी नसली तरी देखील निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर ते त्रंबकेश्वर मंदिरापर्यंत पायी चालत वारीचे समाधान घेतले. भर पावसात आणि भल्या पहाटे भाविकांनी दर्शनासाठी तर महिलांनी औक्षणासाठी हजेरी लावली.


संत तुकोबांच्या पादुका शिवशाही एसटीत विराजमान झाल्या. त्याआधी संत तुकोबांच्या पादुका मंदिरातून थेट इनामदार वाड्यात आल्या. इनामदार वाडा हा तुकोबांचे आजोळ घर. इथं आरती झाल्यानंतर पादुका शिवशाहीनं पंढरीकडे रवाना होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संत तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या हस्ते पूजा पार पडली. 


संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज शिवशाहीबसमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. ज्या बसमधून ही पालखी जाणार आहे त्याचे चालक सोमनाथ होले आहेत. सोमनाथ हे स्वतः वारकरी आहेत, मागील 22 वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळात सेवा देत आहेत. आणि आज अशाप्रकारे पालखी सोहळ्यात सहभागी होण्याच्या मान मिळाल्यामुळे त्यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले. 


श्री संत सोपानकाका आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज यांची पालखी आज बसने पंढरपूरकडे रवाना होणार आहे. काही वेळातच मंदिरात भजन कीर्तनला सुरुवात होणार आहे.. या नंतर शिवशाही बसने पालखी पंढरपूरकडे रवाना होईल.. दरवर्षी लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारे पालखी सोहळे यंदा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत.