सिंधुदुर्ग : कावीलकट्टा गावातून साईबाबांची पालखी शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहे. सिंधुदुर्गातील कावीलकट्ट गावात साईबाबांचं देशातील पहिलं मंदिर बांधलं गेलं होतं. त्यामुळे इथून निघणाऱ्या पालखीबाबत तमाम साईभक्तांच्या मनात महत्त्वाचं स्थान असतं.


कावीलकट्टा हे सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील गाव आहे. 1918 साली साईबाबांनी शिर्डी मुक्कामी देह ठेवला आणि त्यानंतर चार वर्षांनी कावीळकट्टा गावात त्यांचं मंदिर उभारलं गेलं. साईबाबांच्या एका निस्सिम भक्ताने या मंदिराला मूर्तस्वरुप दिले. हे देशातील पहिले मंदिर असल्याचे म्हटले जाते.

साईबाबांच्या भक्तांनी कुडाळमधील या साई मंदिरापासून शिर्डीपर्यंत पालखीसोबत पदयात्रा काढली आहे. जवळपास 700 किलोमीटरचा हे अंतर आहे. यामध्ये सिंधुदुर्गातून अनेक साईभक्त पदयात्रेत सहभागी झाले आहेत. साईंच्या नावाचा जयघोष करत, पदयात्रा शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहे.